Join us

दादर फेरीवाला कारवाईची आयुक्तांकडून पाहणी; अनधिकृत फेरीवाल्यांवर काही दिवसांपासून कारवाई सुरु झाली

By जयंत होवाळ | Published: July 01, 2024 6:55 PM

अनधिकृत फेरीवाल्यांवर काही दिवसांपासून कारवाई सुरु झाली आहे. विशेषतः अत्यंत वर्दळीच्या व अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करुन अनधिकृत फेरीवाले हटवण्यात आले आहेत.

मुंबई : न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबई महापालिकेच्या फेरीवाला हटाव मोहिमेला वेग देण्यात आला असून खुद्द आयुक्त भूषण गगराणी रस्त्यावर उतरले आहेत . गेल्या दोन दिवसांपासून दादर पश्चिम परिसरात मोहीम सुरु असून सोमवारी गगराणी यांनी या परिसराला अचानक भेट देवून  पाहणी केली.

अनधिकृत फेरीवाल्यांवर काही दिवसांपासून कारवाई सुरु झाली आहे. विशेषतः अत्यंत वर्दळीच्या व अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करुन अनधिकृत फेरीवाले हटवण्यात आले आहेत. फेरीवाले तसेच इतर अतिक्रमणे यामुळे पादचाऱयांना अडचणींचा सामना करावा लागतो. पालिकेच्यावतीने अनधिकृत फेरीवाले व पदपथांवरील अतिक्रमणे यावर  केली जाणारी कारवाई अधिक तीव्र करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानुसार, अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग द्यावा, आत्यंतिक वर्दळीच्या परिसरांमध्ये अधिक नियोजनपूर्वक व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करावी, रस्त्यांच्या कडेची  बेवारस वाहने हटवावीत, असे निर्देश गगराणी यांनी सर्व संबंधित विभागांना दिले होते. याअनुषंगाने काही दिवसांपूर्वी पालिका मुख्यालयात पोलीस प्रशासनासमवेत बैठकही  देखील पार पडली होती . त्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ठिकठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई अधिक तीव्रतेने राबविण्यात येत आहे.

अत्यंत वर्दळीचा परिसर म्हणून दादरची ओळख आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरातून अनधिकृत फेरीवाले हटवल्यानंतर नागरिकांनी त्याचे स्वागत केले होते. या ठिकाणची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी गगराणी यांनी आज भेट देवून पाहणी केली. दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील सेनापती बापट मार्ग, केशवसूत उड्डाणपुलाखालून ये-जा करण्यासाठी असणारे प्रवाशी मार्ग / गाळे, तसेच संलग्न असणारे एम. सी. जावळे मार्ग, डॉ. डिसिल्वा मार्ग, रानडे मार्ग इत्यादी सर्व परिसरांमध्ये पायी फिरुन  आयुक्तांनी पाहणी केली. अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई सुरु ठेवावी, वीजेच्या अनधिकृत जोडण्या आढळून येताच त्या तातडीने खंडीत कराव्यात, रेल्वे स्थानक परिसरातील कचरा निर्मूलन प्रभावीपणे करुन परिसर स्वच्छ ठेवावा, इत्यादी निर्देश देत त्यावर विशेष लक्ष ठेवण्याचीही सूचना त्यांनी  केली.

त्याचप्रमाणे, दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सोपे व्हावे, यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या वाहनांच्या तुलनेत लहान आकाराची अतिक्रमण निर्मूलन वाहने उपलब्ध करुन घेण्याचीही सूचना गगराणी यांनी केली. या पाहणीप्रसंगी जी-  उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजीतकुमार आंबी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (छत्रपती शिवाजी महाराज मैदान पोलीस स्थानक)  मुरकुटे यांचेसह पालिकेचे तसेच दादर पोलीस स्थानकातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.