मुंबई : तौक्ते वादळामुळे मालाड पश्चिम येथील मढ कोळीवाड्याची हानी झाली आहे. शासनाच्या सूचनेनुसार मढ कोळीवाड्यातील सर्व नौका १५ मे २१ रोजी सुखरूप बंदरात आल्या होत्या. परंतु एकीकडे अतिवृष्टीत व दुसरीकडे तौक्ते वादळाच्या रुद्रावताराने थैमान घालून मढ बंदरात सुखरूप नागरून ठेवलेल्या २५ ते ३० पारंपरिक मासेमारी नौकांचे नागरांचे दोर तुटून नौकांचे तुकडे तुकडे झाले.
त्यामुळे आज सकाळी शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे व पी/उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेविका संगीता संजय सुतार यांनी तौत्के चक्रीवादळात वादळग्रस्त मढ कोळीवाड्याला भेट दिली. यावेळी रोजीरोटी गेलेल्या कोळी महिला व मच्छिमारांनी आपली कैफियत मांडली आणि शासनाकडून लवकर मदत मिळवून देण्याची विनंती केली.
मत्यव्यवसाय खात्याचे परवाने अधिकारी अशोक जावळे यांना युद्धपातळीवर पंचनामे करण्याची सूचना सुधाकर सुर्वे यांनी केली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त अर्थिक मदत मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी समाजसेवक संजय सुतार, मालाड वि.स.सं. अनिल भोपी, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, शाखाप्रमुख संदेश घरत, हरबादेवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष महेश पाटील, मढ मच्छीमार विविध का.सह.सो. चे अध्यक्ष हरिश्र्चंद्र आखाडे, मढ दर्यादीप म.सह.सो.चे अध्यक्ष संतोष कोळी, मढ सर्वोदय सह.सो.चे अध्यक्ष चंद्रकांत नगी, शाखाप्रमुख संदेश घरत, शिवसैनिक, मढ ग्रामस्थ, मच्छीमार बांधव, कोळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
-- --------------------------------------*