लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राजकोटच्या गेमिंग झोनला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबईअग्निशमन दल अलर्ट मोडवर आले असून, रविवारपासून येत्या ३१ मेपर्यंत मुंबईतील सर्व मॉल्समधील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये दोषी असणाऱ्या किंवा अग्निसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या आस्थापनांना नोटिसा पाठविल्या जातील आणि आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती मुख्य अग्निशमन दल अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) संतोष सावंत यांनी दिली.
मुंबई अग्निशमन दलाकडून मुंबईतील सर्व व्यावसायिक आणि रहिवासी आस्थापनांचे नियमित आणि अचानक अशा दोन्ही प्रकारच्या तपासण्या होत असतात. मागील अधिवेशन आधीच अग्निशमन दलाकडून शहरातील ६९ माल्सची तपासणी करून अहवाल सादर केला होता. यामध्ये ६ ते ७ मॉल्समधील अग्निसुरक्षेत त्रुटी सापडल्याने त्यांना नोटिसाही पाठविल्या होत्या. आता राजकोटच्या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने पालक आणि मुलांची या मॉल्समधील वाढलेली ये-जा पाहता येत्या दि. ३१ मेपर्यंत मुंबईतील सर्व मॉल्सची पुन्हा एकदा तपासणी करणार आहेत. तपासणीनंतर किती मॉल्समध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा नियमावलीप्रमाणे कार्यरत आहे? कितींमध्ये त्रुटी आहेत याचा हवाला सादर केला जाईल, अशी माहिती सावंत यांनी दिली.
नेमकी तपासणी कशाची?
मॉल्समधील एकूण होणारी वर्दळ, त्यासाठी असलेली उपलब्ध जागा ही पुरेशी प्रमाणात आहे का? गेमिंग झोनसाठी असणारे प्रवेश आणि निष्कासन दरवाजे हे मोठ्या आकाराचे आणि प्रशस्त आहेत का? तिथे असणारे वेगवेगळे गेम्स हे विद्युत उपकरणावर आधारित असल्याने त्याची योग्य चाचपणी झाली का? गेमिंग झोन आणि मॉल्ससाठी आवश्यक असणाऱ्या काही प्राथमिक परवानग्या या वॉर्ड अधिकाऱ्यांकडून किंवा संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेतल्या आहेत का? याची माहिती अग्निशमन दल घेणार आहे.
पोलिस वॉर्ड अधिकाऱ्यांशी समन्वय
ही मोहीम आठवडाभर चालणार असून, लवकरच रेस्टॉरण्ट, बारमधील अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी तसेच परवाना तपासणी मोहीमही पोलिसांच्या आणि वॉर्ड अधिकाऱ्यांच्या मदतीने हाती घेण्यात येणार आहे. मॉल आणि बार, रेस्टॉरंट तसेच ऑर्केस्ट्रा बारमधील अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्यात, परवान्यात काही त्रुटी असल्यास त्याचे पालन करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. या मुदतीनंतर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.