Join us

अंधेरीतील सराईत सोनसाखळी चोर अटकेत

By admin | Published: January 11, 2016 2:25 AM

रात्रीच्या अंधारात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणे आणि मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांच्या सोनसाखळी चोरी करणाऱ्या दुकलीला अंधेरीतून रविवारी अटक करण्यात आली.

मुंबई: रात्रीच्या अंधारात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणे आणि मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांच्या सोनसाखळी चोरी करणाऱ्या दुकलीला अंधेरीतून रविवारी अटक करण्यात आली. इजाज शेख (२४), सिफियान इसाक दळवी (३२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल १ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.अंधेरी पश्चिमेकडील गावदेवी डोंगर परिसरात राहण्यास असलेल्या या दुकलीने पश्चिम उपनगरात धुमाकूळ घातला होता. रात्रीच्या अंधारात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणे आणि पहाटेच्या वेळेत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांच्या सोनसाखळी चोरी करण्याचा त्यांचा दिनक्रम होता. त्यांच्या विरोधात डी. एन. नगरमध्ये २, बांगुरनगरमध्ये १ आणि अंधेरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. रविवारी ही टोळी अंधेरी परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी प्रतिबंध कक्षाला मिळाली. कक्षाचे पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक रऊफ शेख यांच्या तपास पथकाने सापळा रचून या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २ सोनसाखळी चोरी आणि ५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले. सोन्याची चेन, महागडी घड्याळे, मोबाइल्स, टॅब, लॅपटॉप असा १ लाख २७ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)