हत्येनंतरही सोबत; एनआयएच्या तपासातून उलगडा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या पोलीस निरीक्षक सुनील माने याने ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांना फोन करून बोलावले होते. तावडेच्या नावाने बोलावून त्यांची हत्या केल्यानंतर तो स्वतंत्र वाहनातून त्यांच्यासोबत प्रवास केला असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया निवासस्थानाजळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार व मनसुख हिरेन यांच्या हत्याप्रकरणात मानेने मुख्य आरोपी असलेल्या निलंबित एपीआय सचिन वाझेला गुन्ह्यात व त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केली असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.
कांदिवली गुन्हे शाखेचे (कक्ष ११) प्रभारी असलेल्या मानेने ४ मार्चला मनसुख हिरेन यांना तावडे या नावाने फोन करून बोलावून घेतले होते. त्यानंतर वाझे, विनायक शिंदे व नरेश गोर यांनी हिरेन यांना बेशुद्ध करून गाडीतून रेतीबंदरकडे घेऊन जात असतानाही माने आपल्या वाहनातून त्यांच्यासोबत होता. नाकाबंदीमध्ये त्याच्या गाडीची चौकशी केली जाऊ नये यासाठी त्याने सोबत केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
स्फोटक कारप्रकरणी २५ फेब्रुवारीला दाखल गुन्ह्याचा सीआययू तपास करीत होती. त्यावेळी सुनील माने हा २, ३ व ४ मार्चला मुंबई आयुक्तालयात येऊन वाझेला भेटला होता. मनसुख हिरेनच्या उपस्थित झालेल्या बैठकीवेळीही तो हजर होता. सुरुवातीला त्याने आपण शस्त्र परवान्याच्या कामासाठी मुख्यालयात आल्याचे सांगितले होते. मात्र इतरांच्या जबाबातून ही बाब खोटी असल्याचे उघड झाले.
....................................