Join us

वाडा एसटी आगाराची राज्यमंत्र्यांकडून पाहणी

By admin | Published: June 23, 2014 10:44 PM

वाडा बसस्थानकाला आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी सोमवारी भेट देऊन आगाराची पाहणी केली.

वाडा : वाडा बसस्थानकाला आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी सोमवारी भेट देऊन आगाराची पाहणी केली. नव्याने सुरू झालेले बसस्थानक अनेक गैरसोयींनी वेढलेले असून वाड्यापासून १ किमीवर आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असल्याने शिवसेनेचे भिवंडी विधानसभा संपर्कप्रमुख गिरीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यमंत्री गावित यांची भेट घेऊन सर्व गाड्या जुन्या स्थानकमार्गे रवाना कराव्यात, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. या वेळी गावित यांनी सर्व लांब पल्ल्यांच्या व ग्रामीण भागांतील बस जुन्या स्थानकातूनच पुढे रवाना कराव्यात, अशा सूचना आगारप्रमुख बी.बी. नाईकवाडी यांना दिल्या. तसेच नवीन स्थानकात पाण्याची व्यवस्था, शौचालय, बैठक व्यवस्था योग्य नसल्याने त्यांची तातडीने दुरुस्तीच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या. शिवाय, जुन्या स्थानकात पावसाळ्यात खड्डे पडून पाणी साचू नये म्हणून ५ लाखांचा विशेष निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गावित यांनी दिले.या वेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनीष गणोरे, तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, कुणबी सेनेचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पाटील, राष्ट्रवादीचे सुरेश पवार, शिवसेनेच्या शिष्टमंडळात तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, जि.प. सदस्य ज्योती ठाकरे, पंचायत समिती सदस्य निलेश गंधे, उपतालुकाप्रमुख तुषार यादव आदी उपस्थित होते. (वार्ताहर)