लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी स्वतःची रिव्हॉल्व्हर वापरण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने स्वसंरक्षणासाठी आपल्याला वैयक्तिक हत्यार हवे असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे.
सध्या मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या निरीक्षक अनुप डांगे यांच्यावर परमबीर सिह यांनी त्यांच्याशी संबधित बारवर कारवाई केली म्हणून खोटे गुन्हे दाखल केले. याप्रकरणी अनुप डांगे यांच्या तक्रारीवरून एसीबीकडून खुली चौकशी सुरू आहे. डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आयुक्त असताना त्यांना गावदेवी पोलीस ठाण्यात एका प्रकरणात अडकवून निलंबित केले होते, त्याविरुद्ध त्यांनी दाद मागितली आहे.
डांगे सध्या नियंत्रण कक्षात आहेत. त्यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आहे, मात्र ते पोलीस आयुक्तांच्या सूचनेप्रमाणेच वापरता येऊ शकते. काही कामानिमित्त बाहेर गेल्यास ते सोबत नेता येत नाही. बाहेर गेल्यानंतर जीवाला धोका आहे यासाठी खाजगी पिस्तूल वापरण्याची अनुमती देण्याची विनंती डांगे यांनी केली आहे.