Join us

टर्निंग पॉइंट: अपयशातून खचलो पण मिळाली नवी दिशा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 1:58 PM

अपयशातून यशाची पायरी...

डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग,मुंबई

एका लहानशा खेड्यात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. जिल्हापरिषदेच्या शाळेत शिक्षण झाले. शाळाही एक शिक्षकी. एक वर्ग आणि त्यात अभ्यासासाठी लागलेल्या चार ते पाच रांगा.  पुढे शिक्षणाची सोय नाही म्हणून वडील ठाण्याला शिफ्ट झाले. लहानशाच्या घरात मी व माझी भावंडे, चुलत भावंडं असे एकत्र राहण्यास होतो. दहावीला चांगले मार्क मिळाल्याने ठाण्याच्या कळवा या उपनगरात पहिला आलो.              त्यानंतर मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. बारावीच्या परीक्षेला खुप आजारी पडलो. ८६ टक्के मार्क मिळाले.. पुढील शिक्षणासाठी बेळगावमधील मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. 

पहिल्यांदा एकटा लांब जात असल्याने आई रडत होती. निघताना, "आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस" हे तिचे शब्द कायम गाठीशी राहीले. कळत्या-नकळत्या वयात विश्वास टिकवून ठेवण्याचे ते चॅलेंज मी स्वीकारले. आपल्या आईच्या आपल्या करीता असलेल्या भावना, संवेदना ही माझ्यासाठी एक ताकद बनविली जवळपास मेडीकलची साडेपाच वर्ष घराबाहेर राहुनही कुठलेही व्यसन लागू दिले नाही. त्याचबरोबरीने स्वत:ला झोकुन देवून जे करेन त्यात यशस्वी व्हायचे बळ मला मिळाले.        पदवीच्यावेळी कर्नाटकात असल्याने सापत्नपणाची वागणूक होती. प्रॅक्टिकलदरम्यान एका विद्यार्थ्याने मला हटकले. तू हे करू शकत नाहीस म्हणाला. मला वाईट वाटले. मी त्यालाच चॅलेंज देत, तुझ्यापेक्षा या विषयात एक मार्क तरी जास्त घेईन असे सांगितले.  त्यावर्षी थेअरी व प्रॅक्टीकल मध्ये यूनिवर्सिटी मध्ये तिसरा आलो.      पुढे पदवी नंतर ठाणे जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात ज्युनियर डॉकटर म्हणून रुजू झालो. तेथे दिवसभर श्रमदान करून परतलो तेव्हा एका वरिष्ठ डॉक्टरने विनाकारण अपमान केला. कामाचे कौतुक करण्याऐवजी ज्युनियर असून सिनियर बनू म्हणून सर्वासमोर अपमान केला. डोक्यात तिडीक आली तेथून निघालो पुन्हा प्राथमिक आरोग्य् केंद्रात न येण्याच्या ठाम निर्धार करून च. 

रात्रीची वेळ होती नाक्यावर च्या बसस्टॉप वर एकटयाने रात्र काढली. ‘ हे क्षितीज आपल्या साठी पुरेसे नाही व आपण यापेक्षा व्यापक क्षितीजावर स्वताला सिध्द केले पाहिजे याची जाणीव झाली ’ वडीलांच्या मांडीवरुन उठवला गेलेल्या प्रल्हादाला जस आपल्याला कोणी उठवू शकत नाही असे धृवपद मिळवण्याची इच्छा जागृत झाली तसेच  काहीतरी माझेही झाले. झालेल्या अपमानाने पुन्हा एकदा स्वतःला आणखीन काही तरी मोठं करण्याचे चॅलेंज दिले.

त्याही वेळी नोकरी पुर्णत: सोडण्याचे धाडस नव्हते. प्राथमिक आरोग्य् केंद्राचे तेथुन दहा किमी. अंतरावर अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ‘ चोंढा’ या गावात एक प्राथमिक उपकेंद्र होते. त्या ठिकाणी राहून  काम करीत राहिलो. पण असे एकांतात किती दिवस काम करणार आणि त्यातुनच मनात युपीएसएसी परीक्षा देण्याची इच्छा तीव्र होवू लागली. आमचे आरोग्य् केंद्र हे ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत होते. त्यावेळी एका मिटींगसाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य् विभागात आलो होतो. ठाणे जिल्हा परिषदेच्या समोरच असलेल्या व ठाणे महानगरपालिकेकडून चालविल्या जाणा-या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्रासमोर त्यांच्या प्रवेश प्रक्रियेविषयीची जाहीरात पाहिली.त्याचा फॉर्म भरला. 

परीक्षा 5 सप्टेंबरला होती तो रविवारचा दिवस होता. परीक्षा देवून घरी आलो. वडिलांशी याबाबत चर्चा सुरु असतानाच, अचानक फोन खणखणला कॉल करणाऱ्याने माझ्या सख्या चुलत भावाचा अपघात झाल्याचे सांगितले. तात्काळ रुग्णालय गाठले. तेथून त्याला सायन रुग्णालयात नेण्यास सांगितले. जखमी भावाला घेऊन रुग्णवाहिकेतून सायनच्या दिशेने निघालो. त्याने माझा हात घट्ट पकडला होता " रवी मला वाचव " म्हणत होता. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वी त्याने प्राण सोडले. तो आयुष्यातील खुप मोठा धक्का होता. त्याची स्मृती म्हणून त्याचे डोळे दान करण्याचे ठरवले मात्र तेथील पोलिसांनी अपघात असल्याने नकार दिला.

माझे माझ्या भावावर खुप जास्त् प्रेम होते ‘चोंढा’ येथील उपकेंद्रात काम करीत असताना त्याच्या आठवणीने खुप रडू यायचे. पण त्याचवेळी आपल्या भावाचे आपल्यावर किती प्रेम होते याची आठवण व्हायची. असे वाटायचे की मी  असे काही करावे ज्याने माझा भाऊ जिथून कुठून मला पाहत असेल तिथे त्याला माझा  अभिमान वाटेल. म्हणुन पुन्हा भावाच्या विश्वासाला पात्र व्हायचे  ठरवले.                  यूपीएससीच्या परीक्षेसाठी तीन ते चार महिन्यामध्ये इतका झोकुन देवून अभ्यास केला त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात  प्रीलिमध्ये पात्र झालो. मुख्य् (मेन्स) मध्येही पात्र झालो. व पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचलो. मुलाखतही चांगली झाली होती. निकालाचा दिवस होता, निकालाच्या ओढीने कशाचेच भान नव्हते त्यात काहीही खाल्ले नव्हते, निकाल पाहण्याचे देखील धाडस होत नव्हते दिवसभर काहीएक न खाल्याने खुप वेळ वाट पाहात राहिल्याने व त्यातच कोणीतरी मला येवुन सांगितले की माझे नाव अंतीम यादीमध्ये नाही. त्यावेळी खुप मोठा धक्का बसला. मुलाखतीपर्यंत पोहचलेल्या दोन पैकी एकाची  निवड होते, दुर्दैवाने 3 मार्कांनी माझे अंतिम यादीत नाव नव्हते. त्या वेळी मी बेशुध्द झालो. 

मला त्याच अवस्थेत सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करण्यात आले जेव्हा आई-वडील आले त्यांच्या आवाजाने मी शुध्दीवर आलो व आई-वडीलांना ‘मला माफ करा’ असे त्यांना म्हणालो तेव्हा ‘शांत रहा . आमचा तुझ्यावर व देवावर विश्वास आहे तु प्रयत्न् कर धीर सोडू नको असे वडीलांनी सांगितले व धीर दिला.

त्यावेळी परीक्षेला 2 दिवस असताना माझ्यासोबत असणारा माझा मित्र बिपीनने  ‘ सोबत येवू का ?’ असे म्हटल्यामुळे त्या दु:खातही संवेदनशीलतेचा झरा वाहायला लागला जी वेदना व्याकुली करते पण वात्सल्याच्या विशाल क्षितीजांकडे घेवून जाते ती वेदना म्हणजे संवेदना, जी वेदना हृदयाची तार छेडते आणि सकारात्मकतेकउे घेवून जाते ती वेदना म्हणजे संवेदना …

मी स्वतःमध्ये ती संवेदना घेवून त्याच अवस्थेत प्रीलीमची तयारी केली त्यावेळची प्रीलीम इतकी चांगली केली की, निकालाची वाट न पाहता पुन्हा त्याचदिवशी त्याच संध्याकाळी मुख्य्( मेन्स्) परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. पुढे मुख्य् (मेन्स्) परीक्षा देखील अत्यंत चांगली केली मुलाखतीची तयारी देखील जोमाने केल्याने मुलाखत देखील चांगली गेली व त्यावर्षी संपुर्ण भारतात 53 वा व महाराष्ट्रात 2 रा येवुन माझी निवड झाली आणि मी आय.पी.एस झालो.

गडचिरोली, गोंदिया, सांगली, सिंधुदुर्ग, बुलढाणा मध्ये एसपी म्हणून कामगिरी बजावली. तेथून मुंबईच्या अतिमहत्त्वाच्या अशा परिमंडळ एकमध्ये पावणे चार वर्ष पोलीस उपायुक्त, विशेष शाखा आणि मध्य मुंबई चा अप्पर पोलीस आयुक्त, तेथून तीन वर्षे पुण्यात सह आयुक्त व सध्या लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहे.  या दरम्यान ज्या मुल्यांनी ज्या संवेदनशीलतेने मला बळ दिले ती संवेदनशीलता मी कधीच कोमेजू दिली नाही, कितीही आव्हाने आली तरी नैतिकतेच्या बळापूढे इतर कोणतीही आव्हाने कधीच टिकू शकत नाहीत याची जाणीव ठेवली.                     मी युवकांना सांगेन की आयुष्य हा एक गेम आहे. येणारी परिस्थिती म्हणजे त्यातील एक लेव्हल. आयुष्य नावाचा गेम प्रत्येकानेच खेळला पाहिजे. प्रत्येक चॅलेंज, त्याचा प्रवास आनंदाने जगायला हवा. प्रत्येक लेव्हल पार करत एक चांगले आयुष्य जगायला हवे. आयुष्य चालतेय म्हणण्यापेक्षा ते कसे धावेल त्यादिशेने प्रयत्न करायला हवे. अपयशही यशाची पायरी आहे, देखील लक्षात ठेवायला हवे. 

टॅग्स :मुंबईप्रेरणादायक गोष्टी