प्रेरणादायी विजय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:07 AM2021-01-23T04:07:39+5:302021-01-23T04:07:39+5:30
- रोहित नाईक (वरिष्ठ उपसंपादक, मुंबई) क्रिकेटमध्ये कधी काय होईल, सांगता येत नाही आणि याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये ...
- रोहित नाईक (वरिष्ठ उपसंपादक, मुंबई)
क्रिकेटमध्ये कधी काय होईल, सांगता येत नाही आणि याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कसोटी मालिकेतून आला. भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात केवळ टक्कर नाही दिली, तर त्यांना लोळवले, तेही सलग दुसऱ्यांदा. केवळ क्रिकेटविश्वालाच नाही, तर प्रत्येक खेळाला, प्रत्येक क्षेत्राला या ऐतिहासिक विजयाद्वारे प्रेरणा घेता येईल.
.................................................................
भारतीय क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकून ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती केली. याआधी २०१८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात नमवले होते. पण, यंदाचा विजय अनेकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका विजय मिळवणारा भारतीय संघ पहिला आशियाई संघ असून भारताने सलग दुसऱ्यांदा हा पराक्रम केला, हे विशेष. २०१८ साली कोहलीच्या नेतृत्वात भारताने विजय मिळवला, तेव्हाही क्रिकेटविश्वातून कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र त्याचवेळी काहींनी भारताला स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीचा फायदा झाल्याचे सांगत या विजयाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मात्र ऑस्ट्रेलियाकडे स्मिथ-वॉर्नर तर होते, पण भारतीय संघ विराट कोहलीसह अनेक प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळत होता. तरीही भारतीयांनी तिरंगा फडकावला. त्यामुळे आता टीकाकारांचीही बोलती बंद झाली आहे.
ऑस्ट्रेलिया म्हणजे आक्रमक खेळ... त्यांची जबरदस्त चोपणारी फलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी आणि त्यासोबत लक्ष विचलित करणारी स्लेजिंग. या जोरावर ऑस्ट्रेलियाने अनेक वर्षे घरच्या मैदानावर वर्चस्व राखले. मात्र, टीम इंडियाने २०१८ साली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत आपले नाणे खणखणीत वाजवले होते. हाच जोश घेऊन यंदाही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला आव्हान दिले.
पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात वर्चस्व मिळवत भारताने यजमानांना धोक्याचा इशारा दिलाच होता. परंतु, दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजीला भगदाड पडले आणि संपूर्ण संघ केवळ ३६ धावांत बाद झाला. यानंतर क्रिकेटविश्वातून उडविण्यात आलेल्या खिल्लीमुळे भारतीयांचे मानसिक खच्चीकरण झाले. अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारताच्या ४-० अशा पराभवाचे भाकीतही केले. त्याचवेळी चोहोबाजूंनी होणारी ही टीका भारतीय संघासाठी ‘बूस्टर’ ठरली.
पहिल्या कसोटीतील दारुण पराभव आणि त्यानंतर पितृत्व रजा घेऊन मायदेशी परतलेला कर्णधार विराट कोहली यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कितपत लढा देणार, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली. कोहलीच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळलेला हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे याने निर्माण केलेला आत्मविश्वास आणि त्याला मिळालेली जिगरबाज खेळाची साथ या जोरावर भारतीय खेळाडूंनी सांघिक खेळाचे सर्वोत्तम प्रदर्शन केले.
हा शानदार विजय अनेकदृष्ट्या प्रेरणादायी ठरला. काय शिकवले टीम इंडियाने आपल्याला... सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘टीमवर्क’. एक टीम म्हणून काम करत असताना प्रत्येकाला एकमेकांना विश्वासाने आणि प्रोत्साहन देऊन काम करावे लागेल. सहकाऱ्यासोबत स्पर्धा न करता, साथ देऊन पुढे जावे लागेल. याच जोरावर टीम इंडियाने बाजी मारली. शुभमन गिल, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, टी. नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर कोणताही दबाव न येऊ देता, या सर्व नवख्या सहकाऱ्यांवर विश्वास दाखवून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम कर्णधार रहाणेने केले. बॉस बनण्यापेक्षा पुढाकाराने जबाबदारी घेत लीडर बनणे यशस्वी संघासाठी निर्णायक ठरते, हे रहाणेने दुसऱ्या कसोटीत शतक झळकावून दाखवून दिले. परिस्थिती कितीही बिकट असो, अखेरपर्यंत लढत राहायचे, हे तिसऱ्या कसोटीत भारतीयांनी सिद्ध केले. तसेच, यशस्वी होण्यासाठी केवळ एक योजना असून चालत नाही, तर त्यासाठी ‘प्लॅन बी’चीही गरज असते. हा ‘प्लॅन बी’च अखेरच्या कसोटीत भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी चूक ठरली ती म्हणजे त्यांनी पहिल्या कसोटीतील दणदणीत विजयानंतर भारतीयांना गृहीत धरले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमध्येच गुणवत्तेची खरी परीक्षा होते, ही बाब कांगारू विसरले. युवा खेळाडूंनी मिळालेली संधी साधताना आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविला. हा विजय अनेक वर्षे टीम इंडियाला प्रोत्साहित करेल. या जोरावरच आता क्रिकेटविश्वावर राज्य करण्यासाठी भारतीयांनी ‘गार्ड’ घेतला आहे.