मुंबई : भायखळा विभागात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतींचे आगमन आणि आता विसर्जन खड्ड्यांतून करण्याची वेळ भाविकांवर आली आहे. परिणामी, अनंत चतुर्दशीपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत, तर पितृपक्षात रस्त्यांचेच प्रतीकात्मक श्राद्ध घालण्याचा इशारा ऊर्जा फाउंडेशनने महापालिकेला दिला आहे.फाउंडेशनचे अध्यक्ष विजय लिपारे म्हणाले की, भायखळा विधानसभा क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, रामभाऊ भोगले मार्ग आणि दत्ताराम लाड मार्गावर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. त्यात गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसाने तर रस्त्यांची रयाच गेली आहे. मुळात भायखळ्यात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते, असा प्रश्न पडत आहे. याच खड्ड्यांमुळे येथील सार्वजनिक आणि घरगुती गणपतींच्या आगमन सोहळ्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सार्वजनिक मंडळांनी तर खड्डे चुकवण्यासाठी मार्गच बदलले होते. याशिवाय खड्डे चुकवणाºया मंडळांच्या प्रयत्नांमुळे दत्ताराम लाड मार्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वाहतूककोंडीही झाली होती. परिणामी, अनंत चतुर्दशीपर्यंत तरी महापालिकेने संबंधित खड्ड्यांचा प्रश्न सोडवा, असे आवाहन केले आहे. यासंदर्भातील निवेदन आयुक्तांना सोमवारी देण्यात येणार आहे.मुळात उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही महापालिकेला रस्त्यावरील खड्डे बुजवता आलेले नाहीत. त्यातल्या त्यात गिरणगावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मुंबईतील इतर विभागांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाºया भाविकांची संख्याही तुलनेने अधिक आहे. अशा परिस्थितीत खड्ड्यांच्या त्रासामुळे वाहतूककोंडी तर होतेच आहे. शिवाय खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने ये-जा करणाºया वाहनांमुळे हे गलिच्छ पाणी भाविकांच्या अंगावर उडण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापर्यंत खड्डे बुजवण्यात आले नाहीत, तर पितृपक्षात संबंधित रस्ते मृत झाल्याचे घोषित करून प्रतीकात्मक श्राद्ध घालण्याचा इशारा लिपारे यांनी दिला आहे. त्यात रस्त्यांवरील खड्ड्यांवर शास्त्रोक्त पद्धतीने विधी करून ब्राह्मणाच्या उपस्थितीत या प्रतीकात्मक श्राद्धाचे निषेध आंदोलन केले जाईल.
पितृपक्षात रस्त्यांतील खड्ड्यांचे श्राद्ध घालणार!, ऊर्जा फाउंडेशनचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 3:19 AM