'तिनं' २५० मुलींना वाटले सॅनिटरी नॅपकिन; 'पॅडमॅन' पाहून १३ वर्षीय मुलीचं कौतुकास्पद पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:16 PM2018-12-03T16:16:34+5:302018-12-03T16:19:55+5:30
वर्षभर पुरतील इतक्या सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप
मुंबई: अभिनेता अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' पाहून प्रेरित झालेल्या एका 13 वर्षीय मुलीनं कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. या मुलीनं महाराष्ट्रातील 250 मुलांना सॅनिटरी नॅपकिन मोफत दिले आहेत. रीवा तुळपुळे या मुलीनं शहापूर तालुक्यातील मुलींना वर्षभर पुरतील इतके सॅनिटरी नॅपकिन्स दिले आहेत. विशेष म्हणजे यासाठी रीवा दुबईहून शहापूरला आली होती.
काही महिन्यांपूर्वी अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' पाहिल्यानंतर 13 वर्षाच्या रीवाला सॅनिटरी नॅपकिन्स वाटण्याची कल्पना सुचली. त्यानंतर तिनं या कामासाठी दुबईत निधी गोळा करण्यास सुरुवात केली. ती गेल्या आठवड्यात भारतात आली. त्यावेळी तिनं शहापूरमधील 250 मुलींना सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप केलं. 'काही महिन्यांपूर्वी पॅडमॅन पाहिल्यावर मला मासिक पाळीदरम्यान मुलींना होणारा त्रास समजला. तेव्हा आपल्या देशातील, विशेषत: माझ्या महाराष्ट्रातील मुलींसाठी काहीतरी करण्याचा निश्चय मी केला,' असं रीवानं सांगितलं.
यानंतर रीवानं हा विचार कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे बोलून दाखवला. आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या रीवाला डावखरेंनी प्रोत्साहन दिलं. या कामासाठी रीवानं दिवाळीच्या दिवसात दुबईत निधी गोळा केला. यानंतर तिनं 250 मुलींना वर्षभर पुरतील इतके सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी केले. डावखरे यांच्या 'समन्वय प्रतिष्ठान' या एनजीओच्या वतीनं या सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप करण्यात आलं.