Join us  

प्रेरणादायी चरित्र घरोघरी पाेहोचावे, राज्यापालांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 2:58 PM

राज्यपाल कोश्यारी : ‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पत्रकार राजा माने यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीत योगदान देणाऱ्या ७५ व्यक्तींचे केलेले चरित्रात्मक वर्णन सुंदर, सजीव व प्रेरणादायी झाले असून, त्यांचे पुस्तक घरोघरी पोहोचावे, अशी भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी व्यक्त केली.ज्येष्ठ पत्रकार राजा मानेलिखित ‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी राजभवन येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांसह माजी राज्यपाल डॉ.डी.वाय. पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा, लेखक राजा माने, रेखाचित्रकार नितीन खिलारे उपस्थित होते. 

राज्यपाल म्हणाले की, देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे, तसेच महाराष्ट्र राज्यही आपले हीरकमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. अशा वेळी राज्यातील ७५ प्रतिभावंत व्यक्तींचे व्यक्तिचित्रण करणे व त्याला सुंदर रेखाचित्रांची जोड देणे हा नावीन्यपूर्ण प्रयोग आहे. राजा माने यांनी आपल्या पुस्तकातून राज्यातील हिरेही दाखवून दिले आणि अमृतही दिले असून, त्याचे रसपान वाचकांनी करावे. आजकाल समाजात कर्तृत्व व नम्रता हे गुण एकत्र अभावाने आढळतात, असे मत व्यक्त करताना, राजा माने यांनी प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवनावरील पुस्तक दिल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी असलेली सुसंवादाची परंपरा पुन्हा यावी, असे मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले.यावेळी चित्रकार नितीन खिलारे यांनी काढलेल्या व पुस्तकात समाविष्ट केलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिचित्रांच्या प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली. सोलापूर येथील शिवरत्न शेटे व संतोष ठोंबरे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.

टॅग्स :भगत सिंह कोश्यारी