ट्रॉलर जाळ्यातून कासवे वेगळे करणारे उपकरण लावा; मत्स्य विभागाच्या मच्छिमारांना सूचना
By मनोहर कुंभेजकर | Published: June 17, 2024 05:44 PM2024-06-17T17:44:23+5:302024-06-17T17:44:40+5:30
वन्य जीवन सुरक्षिता प्रमाणे समुद्री कासवे सुरक्षित प्रजाती म्हणून आंतरराष्ट्रीय मानदंड ठराविण्यात आला आहे.
मुंबई-अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने, भारतातून निर्यात होणाऱ्या समुद्री कोळंबी करिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. मागील अनेक वर्षांपासून भारतातील कोळंबी, अमेरिकामध्ये निर्यात होत नाही. परिणामी भारतातून अमेरिकेत होणारी मासळी निर्यात ४० टक्के कमी झाली आहे. भारतातील मच्छिमार ट्रॉलर पद्धतीने यांत्रिक मासेमारी करताना वापरण्यात येणाऱ्या जाळ्या मध्ये कासवे वेगळे करणारे उपकरण लावत नाहीत.त्यामुळे कासवे जाळ्यात अडकतात असा आक्षेप अमेरिकन सरकारने नोंदविला आहे.
वन्य जीवन सुरक्षिता प्रमाणे समुद्री कासवे सुरक्षित प्रजाती म्हणून आंतरराष्ट्रीय मानदंड ठराविण्यात आला आहे. सागरी मासेमारी करताना ट्रॉलर जाळ्यात कासवे वेगळे करणारे उपकरण टर्टल एक्सक्लुडर डिव्हायसेस (टेड) लावण्याची सक्ति अमेरिकेने केली आहे.टेड परिपूर्तता होत नाही, तोपर्यंत भारतातून होणारी मासळी निर्यात अमेरिका थांबवणार आहे. कोळंबी निर्यात न झाल्यामुळे त्याचा फटका भारतातील मच्छिमारांना होत आहे. भारताच्या परदेशी चालनावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होत आहे.
टेड उपकरण ट्रॉल जाळ्यात लावावे, म्हणून मच्छिमारांना मार्गदर्शन करण्याकरिता समुद्री उत्पाद निर्यात विकास प्राधिकारणाने नुकतीच एक जिल्हास्तरीय कार्यशाळा केंद्रीय मत्स्यकी संस्था, वर्सोवा येथे आयोजित केली होती. एमपीइडीएचे संचालक आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायूक्त अभय देशपांडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले. यावेळी महाराष्टाच्या अनेक जिल्यातील मच्छिमार उपस्थित होते.टर्टल एक्सक्लुडर डिव्हायसेस कश्या प्रकारे काम करते व जाळ्यातून कासवे कशा पद्धतीने सुरक्षित बाहेर पडतात, ते चित्रफितीच्या माध्यमातून दाखविले.
या कार्यशाळेकरिता आवर्जून उपस्थित असणारे मच्छिमार नेते प्रदीप टपके यांनी ट्रॉलर जाळ्यात लागणाऱ्या टेड उपकरणाबाबत अनेक शंका व संभ्रम मच्छिमारंमध्ये असून त्याचे निराकरण होणे गरजेचे आहे असे सांगितले.जाळयांतून जेव्हा कासवे सुरक्षित बाहेर पडतील, तेंव्हा मासे सुद्धा बाहेर पडतील हा धोका असून मच्छिमारांचे जाळे रिकामेच राहील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
टेड उपकरण लावण्याची घाई गडबड न करता, अगोदर प्रायोगिक तत्वावर तपासून पाहावे अशी सूचना हर्णे येथील मच्छिमारांनी केली. टेड उपकरण, त्याची किंमत व अनुदान बाबत सविस्तर माहिती मच्छिमारांना द्यावी अशी मागणी वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र लडगे यांनी केली.