मालाड सबवे, पाटकरवाडीत पाणी उपसा करणारे अतिरिक्त पंप बसवा; भातखळकर यांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश
By मनोहर कुंभेजकर | Published: June 8, 2024 02:36 PM2024-06-08T14:36:00+5:302024-06-08T14:37:10+5:30
मालाड पूर्व मधील वॉर्ड क्रमांक ३६ आणि ४५ मधील पावसाळा पूर्व कामांची पाहणी करण्यात आली.
मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रातील मालाड पूर्वमधील पावसाळी कामे तसेच नालेसफाई कामाची पाहणी भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी केली. मालाड सबवे आणि पाटकरवाडी परिसरात पाणी उपसा करणारे अतिरिक्त पंप बसवण्याचे निर्देश आमदार भातखळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.
याशिवाय मालाड सबवे जवळ रेल्वेच्या हद्दीत मायक्रो टनेलिंग करून पाण्याचा निचरा होण्यासाठी अधिकचे मार्ग उपलब्ध करण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे, या कामाला गती देऊन काम पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मालाड पूर्व मधील वॉर्ड क्रमांक ३६ आणि ४५ मधील पावसाळा पूर्व कामांची पाहणी करण्यात आली. त्यात पुष्पा पार्क, सेंट जोसेफ स्कूल जवळील नाला, दत्तमंदिर रोडवरील इंद्रवन सोसायटी जवळील नाला, मंछुभाई रोड सबवे नाला, पाटकरवाडी, देवचंदनगर जवळील नाला या ठिकाणच्या नालेसफाई कामचा आढावा आमदार भातखळकर यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतला.
अपूर्ण रस्ते पूर्ण करणे, खड्डे भरणे, पाणी भरणारी ठिकाणे शोधून त्यावर उपाययोजना करणे, गटारांची स्वच्छता करणे, गटार तसेच नाल्याबाहेर काढून ठेवलेल्या गाळाची तत्काळ विल्हेवाट लावणे यासह विविध विषयांवर आमदार भातखळकर यांनी महापालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, कुठेही पाणी भरू नये, याबद्दलची दक्षता पालिका अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देशही आमदार भातखळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.