Join us

सीएसएमटी ते मुंबई सेंट्रलपर्यंतचे भुयारीकरण 2 महिन्यांत पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 3:11 AM

मेट्रो ३च्या कामाला वेग : फेब्रुवारी २०२० पर्यंत काम करण्याचा मानस

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेसाठी बांधण्यात येत असलेल्या आरेतील कारशेडच्या बांधकामावर जरी स्थगिती दिली असली तरी या संपूर्ण भुयारी मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामाला आता गती आली आहे. फेब्रुवारी २०२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मुंबई सेंट्रलपर्यंत भूमिगत मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या भुयारीकरणाचे कामही फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून सीएसएमटी मेट्रो स्थानकावर स्लॅब आणि प्रवाशांना स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिड्या तयार करण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले असल्याचे एमएमआरसीएलने स्पष्ट केले.

सीएसएमटी ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेट्रो-३ मार्गिकेसाठी भूमिगत मार्गिका तयार करण्यात येत आहे. पॅकेज २ अंतर्गत आतापर्यंत एकूण ७ हजार ६४० मीटर लांबीचे भुयारीकरण करण्यात येत आहे. या पॅकेजमध्ये तयार करण्यात येणाऱ्या भुयारीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यामध्ये आले असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत (एमएमआरसीएल) स्पष्ट करण्यात आले आहे. संपूर्णत: भुयारी असलेल्या मार्गिकेची लांबी ३३.५ कि.मी. इतकी असून या मार्गिकेवर २७ मेट्रो स्थानके असणार आहेत. प्रकल्पाची अंदाजित किंमत २३,१३६ कोटी रुपये इतकी आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गिकेचे सात टप्प्यांमध्ये काम सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण मार्गिकेसाठी ५५ किमी लांबीचे भुयारीकरण करण्यात येत आहे. एमएमआरसीने या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, दोन वर्षांमध्येच याचे तीन चतुर्थांश काम पूर्ण करण्यात आले आहे. २०२२ पूर्वीच भुयारीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आॅक्टोबर २०१७मध्ये याचे काम सुरू करण्यात आले होते. मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामापैकी ४० किमी लांबीचे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. टनेल बोअरिंग मशिन्समार्फत (टीबीएम) मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामाला आता गती आली आहे. आतापर्यंत मार्गिकेच्या भुयारीकरणाचे ७२ टक्क्यांपर्यंत कामही पूर्ण करण्यात आले आहे.

टॅग्स :मेट्रोमुंबई