विद्याविहार रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचा दुसरा गर्डर स्थापन
By जयंत होवाळ | Published: November 5, 2023 04:15 PM2023-11-05T16:15:03+5:302023-11-05T16:19:10+5:30
गर्डरचे काम ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर २ वाजता ते ५ नोव्हेंबर पहाटे साडेपाच या कालावधीत पूर्ण करण्यात आले.
मुंबई : एन विभागाच्या हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामकृष्ण चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या रुळांच्या वरून जाणाऱ्या उड्डाणपुलाचा दुसरा गर्डर बसवण्याची कामगिरी मुंबई महापालिकेने शनिवारी मध्यरात्री फत्ते केली.
या पुलामुळे ईशान्य मुंबईतील नागरिकांना वाहतुकीसाठी आणखी एक पर्याय खुला होईल. येत्या काही दिवसांत पूलाच्या दोन्ही बाजूच्या पोहोच मार्गांची कामे पूर्ण होतील. प्रकल्पाचे संपूर्ण काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
गर्डरचे काम ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर २ वाजता ते ५ नोव्हेंबर पहाटे साडेपाच या कालावधीत पूर्ण करण्यात आले. या कामासाठी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक मंजूर केला होता. आता रेल्वे हद्दीतील पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. गर्डर स्थापनेवेळी खासदार मनोज कोटक, आमदार पराग शहा, आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- लालबहादूर शास्त्री मार्ग व रामकृष्ण चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल दोन मार्गिकांचा आहे. ६३० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३१० मीटर पोहोच मार्ग असेल.
- रेल्वे रुळांच्या वर असलेल्या पुलाची रुंदी २४.३० मीटर असेल. यात दोन्ही बाजूला प्रत्येकी २ मीटरचे पदपथ आहेत. पोहोच मार्ग १७.५० मीटर रुंदीचा असेल.
- दोन्ही बाजूचे रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांची देखील पुनर्बांधणी करण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा मार्गही बांधला जाणार आहे. सोमय्या नाल्याची पुनर्बांधणी देखील करण्यात आली आहे.
आव्हानांचा सामना
- पुलाचा आराखडा २०१६ मध्ये तयार करण्यात आला होता. २०२२ पूल तयार होणार होता. मात्र रेल्वे मंत्रालयाने पुलाच्या डिझाईन मध्ये बदल सुचवले. त्यामुळे रेल्वे हद्दीतील आराखड्यात बदल करावा लागला.
- २ मे २०१८ रोजी पुलाच्या बांधकामाचा कार्यादेश देण्यात आला. मात्र कोविडमुळे प्रकल्पाच्या निर्मितीत अडथळे आले.
- पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण, रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या तिकीट खिडकी कक्षांचे स्थानांतरण, प्रकल्पाच्या रेषेत आलेली अतिक्रमणे काढावी लागली.
- रेल्वे ब्लॉक घेणे हेही आव्हान होते.