ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:16 AM2024-09-19T05:16:54+5:302024-09-19T05:19:23+5:30

ईदच्या काळात डीजे, डान्स आणि लेझर लाइटच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने वरील  टिप्पणी केली.

Installing loudspeakers on Eid is harmful: High Court | ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली

ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली

मुंबई : गणेशोत्सवात लाउडस्पीकरचा व अन्य साउंड सिस्टीमचा वापर करणे हानिकारक असेल तर ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकांमध्येही तोच परिणाम होतो, असे उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले.

ईदच्या काळात डीजे, डान्स आणि लेझर लाइटच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने वरील  टिप्पणी केली. ईदच्या मिरवणुकांमध्ये लाउडस्पीकर व अन्य साऊंड सिस्टीमच्या वापराला परवानगी न देण्याचे आदेश महापालिका व पोलिसांना द्यावेत, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

कुराण  हदीसमध्ये कोणत्याही उत्सवासाठी डीजे किंवा लेझर बीम वापरण्याची शिफारस नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. गेल्या महिन्यात काढण्यात आलेल्या आदेशाचा न्यायालयाने यावेळी संदर्भ दिला. या आदेशाद्वारे,  ध्वनिप्रदूषण  (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत, ठरवलेल्या ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या लाउडस्पीकर व अन्य साउंड सिस्टीमच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

अन्य सणांमध्ये ईदचाही समावेश करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील ओवेस पेचकर यांनी केली. मात्र, आदेशात ‘सार्वजनिक सण’ असे नमूद करण्यात आल्याने ईदचा वेगळा उल्लेख करण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने म्हटले. जे गणेशोत्सवात हानिकारक आहे ते ईदमध्येही हानिकारक आहे, असे म्हणत न्यायालयाने याचिका निकाली काढली.

Web Title: Installing loudspeakers on Eid is harmful: High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.