Join us

कर्जासाठी फोटो, माहिती देताच आर्टिस्टने गमावले हजारो रुपये; डाटा आरोपीच्या हाती, मॉर्फ केलेले अश्लील फोटो केले वायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 10:37 AM

आर्टिस्ट तरुणीला लोन ॲपवरील झटपट लोन भलतेच महागात पडले आहे. तिचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.

मुंबई : आर्टिस्ट तरुणीला लोन ॲपवरील झटपट लोन भलतेच महागात पडले आहे. तिचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या प्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. 

लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २६ वर्षीय आर्टिस्ट तरुणीची फसवणूक झाली आहे. तक्रारीनुसार, इंस्टाग्रामवरून लोन बाबतची लिंक मिळून आली. कर्जाची आवश्यकता असल्याने तिने वैयक्तिक माहिती, फोटो पाठवले. त्यानंतर ७ एप्रिलपासून तिला विविध नंबरने कॉल येण्यास सुरुवात झाली. आरोपींनी मुलीचा चेहरा मॉर्फ करून अश्लील फोटो तयार केले. हे फोटो मित्र, मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना पाठवले. तसेच वारंवार पैशांची मागणी करत ५ हजार उकळले. 

१) बदनामीचा प्रकार वाढताच तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला असून,  पाेलिसांकडून  आरोपीचा शोध सुरू आहे.

तुम्हीच देता निमंत्रण...

१) नागरिकांनी एखाद्या ऑनलाइन लोन ॲप अथवा संकेतस्थळावर सर्च करताच एक व्हॉट्सॲप लिंक देण्यात येते. 

२)  ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे चोरतात. 

३) यामध्येही या लिंकवर क्लिक करताच तुमच्या व्हॉट्सॲपमधील सर्व क्रमांक मिळतील, अशी प्रोग्रामिंग सेट केल्यामुळे तुमचे सर्व काॅन्टॅक्ट त्यांच्याकडे येतात. त्यामुळे कर्ज घ्या किंवा नका घेऊ तुमचे फोटो मॉर्फ करून मित्रांना पाठविण्याची  धमकी देत न घेतलेल्या किंवा घेतलेल्या कर्जाची वसुली केली जाते, पैसे न येताच फोटो शेअर केले जातात. 

अशी घ्या काळजी...

१) सर्वात आधी आपण इन्स्टॉल केलेले लोन ॲप अनइन्स्टॉल करावे. हे ॲप हे थर्ड पार्टी असल्याने तुमच्या मोबाईल मधील मॅनेज युवर गुगल अकाउंट मध्ये जाऊन त्यातील सिक्युरिटी फिचर मध्ये असलेल्या थर्ड पार्टी ॲक्सेस मध्ये जाऊन तुम्ही डाऊनलोड केलेले लोन ॲप तेथूनही काढून टाकावे. 

२) तुमच्या व्हॉट्सॲप कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या सर्वांची ब्रॉडकास्ट लीस्ट तयार करून त्यावर, तुमचा फोन हँक झाला असून,  कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो गॅलरी चोरली असल्याची माहिती त्यांना द्यावी. तसेच फोटो मॉर्फ करून मोठ्या प्रमाणात व्हॉट्सॲपवर व्हायरल करत केल्यामुळे असे फोटो उघडू नये, असे आवाहन करावे.

३)  संबंधित क्रमांक ब्लॉक करण्याबाबतचा संदेश पाठवावा.

टॅग्स :मुंबईसायबर क्राइम