Join us

राहुल गांधींवर टीकेऐवजी पवारांनी मोदींना प्रश्न करावा; राऊत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 2:36 AM

१९६३ च्या भारत-चीन युद्धात भारताने भूभाग गमावला असे विधान पवार यांनी केले होते. ते स्वत: पाच वर्षे संरक्षणमंत्री होते तेव्हा त्यांनी ही चूक दुरुस्त करायला हवी होती.

मुंबई : भारत-चीन तणाव संदर्भात आमचे नेते राहुल गांधी यांनी मूलभूत प्रश्न उपस्थित केले असताना त्यांना शरद पवार यांनी राजकारण न करण्याचा सल्ला देणे उचित नाही. त्याऐवजी राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदी यांनी द्यावीत अशी भूमिका पवार यांनी करायला हवी होती, असे मत ऊजार्मंत्री नितीन राऊत यांनी येथे व्यक्त केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

१९६३ च्या भारत-चीन युद्धात भारताने भूभाग गमावला असे विधान पवार यांनी केले होते. ते स्वत: पाच वर्षे संरक्षणमंत्री होते तेव्हा त्यांनी ही चूक दुरुस्त करायला हवी होती. भारत-चीन युद्धाचा हवाला देणारे पवार यांनी १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानला आम्ही धूळ चारली याचाही उल्लेख करायला हवा होता, असे नितीन राऊत म्हणाले.

पवार काँग्रेसमध्येच तयार झालेलं नेतृत्व आहे. त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल आपुलकी आहे. पवारांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींशी चर्चा केली असती तर त्यांच्या वक्तव्याचा अर्थ लक्षात आला असता. पवार यांनी मोदींना प्रसार माध्यमांना समोर जाऊन वस्तुस्थिती देशासमोर मांडण्याचा सल्ला दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :शरद पवारकाँग्रेसभारतचीननितीन राऊतराहुल गांधी