महागड्या वाहनाऐवजी आमदारांनी दिली होती लालपरीला पसंती, रामभाऊ म्हाळगी यांच्या पत्रातून उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 06:39 AM2019-03-17T06:39:43+5:302019-03-17T11:34:27+5:30
कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीसह महागड्या चारचाकी गाडीने फिरणारे हल्लीचे अनेक आमदार पाहून एके काळी आमदारांना एसटी महामंडळाच्या लालपरीची भुरळ वाटत असावी, यावर बहुतेकांचा विश्वास बसणार नाही.
मुंबई - कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीसह महागड्या चारचाकी गाडीने फिरणारे हल्लीचे अनेक आमदार पाहून एके काळी आमदारांना एसटी महामंडळाच्या लालपरीची भुरळ वाटत असावी, यावर बहुतेकांचा विश्वास बसणार नाही. त्यातही कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी गर्दी करू नये, असे क्वचितच एखाद्या नेत्याने कार्यकर्त्यांना सांगितल्याचे नागरिकांच्या ऐकिवात असेल. मात्र, जनसंघाचे विधानसभेतील पहिले आमदार म्हणून ओळख असलेल्या रामचंद्र काशीनाथ म्हाळगी उर्फ रामभाऊ म्हाळगी यांनी २७ एप्रिल, १९७३ रोजी लिहिलेल्या पत्रातून अनेक कार्यकर्त्यांसह नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले नाही, तर नवलच.
रामभाऊंनी ४६ वर्षांपूर्वी लिहिलेले हे पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. या पत्रात रामभाऊंनी १ मे, १९७३ रोजी सकाळी पुणे-सांगली एसटीने सकाळी ६.१५ वाजता निघण्याचा मजकूर लिहिलेला आहे, तसेच सातारला पोहोचल्यानंतर तेथून कºहाडकरांच्या व्यवस्थेने कºहाडला पोहोचण्याची माहिती दिली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रवासासाठी कुणीही नेण्यासाठी पुण्याला येऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे, तसेच रात्री ११ वाजताच्या कºहाड-पुणे एसटीने आपण स्वत: पुण्यास परतू, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
या वेळी त्यांच्यासोबत कुणीही न येता, पुण्यावरून नेण्यासाठी कºहाडहून संबंधितांनी टॅक्सी पाठविण्याची गरज नसल्याचेही रामभाऊंनी पत्रात नमूद केले आहे. एसटीची व्यवस्था असताना टॅक्सी आणि पेट्रोलसाठी उगाच खर्च का करायचा? असा प्रश्नही रामभाऊंनी पत्रात उपस्थित केला आहे.
त्यांनी लिहिलेल्या या पत्रातील लालपरीतून केलेला प्रवास हा नेत्यांसह कार्यकर्त्यांच्याही डोळ्यात अंजन घालणारा आहे.
पोस्ट व्हायरल
काळजी पोटी एका पदाधिकाऱ्याने रामभाऊंना गाडी पाठविण्यासाठी लिहिलेल्या पत्रास उत्तर देताना रामभाऊंनी हे पत्र लिहिल्याची माहिती आहे. नेमके हे उत्तररूपी पत्र रामभाऊंनी कोणाला लिहिले आहे? त्याची माहिती संबंधित व्यक्तीने गुप्त ठेवली आहे. मात्र, कार्यकर्त्यांच्या गर्दीत हरवलेले आणि महागड्या गाड्या घेऊन प्रवास करणाऱ्या नेत्यांसह लोकलमधून प्रवास करायचा बोभाटा करणाºया नेत्यांना रामभाऊंनी लिहिलेल्या या पत्रातून खूप काही शिकता येईल, अशा पोस्ट सध्या या पत्रासह सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल झाल्या आहेत.