चार हजारांऐवजी १७५० लीटर डिझेल कोटा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:08 AM2021-01-03T04:08:36+5:302021-01-03T04:08:36+5:30

उरण : राज्यातील प्रत्येक मच्छीमाराला मासेमारी करण्यासाठी देण्यात येणारा १५ दिवसांसाठीचा डिझेल कोटा सुमारे चार हजारांऐवजी फक्त १७५० लीटर ...

Instead of four thousand, we will get 1750 liters of diesel quota | चार हजारांऐवजी १७५० लीटर डिझेल कोटा मिळणार

चार हजारांऐवजी १७५० लीटर डिझेल कोटा मिळणार

Next

उरण : राज्यातील प्रत्येक मच्छीमाराला मासेमारी करण्यासाठी देण्यात येणारा १५ दिवसांसाठीचा डिझेल कोटा सुमारे चार हजारांऐवजी फक्त १७५० लीटर देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत. याआधीच मच्छीमारांना डिझेल परताव्याची सुमारे २३० कोटी असलेली थकबाकी देण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे राज्यातील लाखो मच्छीमार पुरते आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच आता नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कमी डिझेलमुळे मच्छीमारांना मासेमारी व्यवसाय करणे आणखी अवघड होऊन बसणार आहे.

मुंबई, उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतून प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय केला जातो. या मच्छीमार व्यवसायावर सुमारे १५ लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. या सात जिल्ह्यांतील १६० मच्छीमार संस्थांच्या ९,६४६ मासेमारी करणाऱ्या यांत्रिक नौकांसाठी १ ते १५ जानेवारी २०२१ या १५ दिवसांसाठी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या प्रत्येक यांत्रिक बोटीसाठी १७५० लीटर डिझेल देण्याचे फर्मान मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी काढले आहेेत. याआधी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या यांत्रिक नौकेसाठी मच्छीमारांना सहा महिन्यांपर्यंत पुरेल इतका डिझेल कोटा मंजूर करण्यात येत होता. त्यामुळे देण्यात येणारा १७५० लीटर डिझेल कोटा एका ट्रिपसाठी अपुराच आहे.

मासळीसाठी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना कधी कधी २०-२५ दिवसांची ट्रीप करावी लागते. त्यामुळे मच्छीमारांवर आता बाहेरून जादा दराने डिझेल खरेदी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आयुक्तांच्या या आततायी निर्णयामुळे राज्यातील मच्छीमारांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे. मच्छीमारांना किमान सहा महिन्यांसाठी पुरेल इतका डिझेल कोटा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.

कोट -

आर्थिक संकटात सापडलेले राज्यातील लाखो मच्छीमार शासनाकडे थकीत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या डिझेल परताव्याच्या रकमेची प्रतीक्षा करीत असतानाच १५ दिवसांसाठी फक्त १७५० लीटर इतकाच डिझेल कोटा मंजूर करून मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी मच्छीमारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मच्छीमारांना किमान सहा महिन्यांसाठी पुरेल इतका डिझेल कोटा मंजूर करण्याची आवश्यकता आहे.

- भालचंद्र कोळी, अध्यक्ष, करंजा मच्छीमार सहकारी संस्था

Web Title: Instead of four thousand, we will get 1750 liters of diesel quota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.