महामानवाला हारफुलांऐवजी वही-पेनने वाहावी आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 06:13 AM2018-12-05T06:13:41+5:302018-12-05T06:13:49+5:30

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६ डिसेंबरला आदरांजली वाहण्यासाठी हारफुले, मेणबत्ती किंवा अगरबत्ती न आणता; त्याऐवजी वही व पेन वाहून आदरांजली वाहावी, असे आवाहन ‘एक वही, एक पेन अभियाना’च्या वतीने करण्यात आले आहे.

Instead of ful, the same-pen will pay the vowi honor | महामानवाला हारफुलांऐवजी वही-पेनने वाहावी आदरांजली

महामानवाला हारफुलांऐवजी वही-पेनने वाहावी आदरांजली

Next

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६ डिसेंबरला आदरांजली वाहण्यासाठी हारफुले, मेणबत्ती किंवा अगरबत्ती न आणता; त्याऐवजी वही व पेन वाहून आदरांजली वाहावी, असे आवाहन ‘एक वही, एक पेन अभियाना’च्या वतीने करण्यात आले आहे. महामानवाला महानिर्वाणदिनी आदरांजली वाहण्यासाठी लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीला जमतात. या अनुयायांना अभियानातर्फे हे आवाहन करण्यात आले आहे.
महामानवाला आदरांजली वाहण्यात आलेल्या हारफुले आणि मेणबत्त्यांचा नंतर काहीच वापर वा उपयोग होत नाही. हे सर्व साहित्य वाया जाते. त्यामुळे या वस्तूंऐवजी महामानवाने दिलेल्या शिकवणीप्रमाणे समाजाच्या शिक्षणासाठी वही-पेन वाहण्याचे आवाहन अभियानाचे प्रमुख राजू झनके यांनी केले आहे. झनके म्हणाले की, बाबासाहेबांच्या चरणी हेच साहित्य वाहिले, तर तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
गेल्या तीन वर्षांपासून चैत्यभूमी, तसेच नागपूरच्या दीक्षाभूमी या ठिकाणी विविध संघटनांच्या माध्यमातून एक वही, एक पेन अभियान राबवण्यात येत आहे. ज्या अनुयायांना या दोन्ही ठिकाणी पोहोचणे शक्य होणार नाही, त्यांनी आपापल्या विभागात मोहीम राबवण्याचे आवाहनही झनके यांनी केले आहे.
महापरिनिर्वाणदिनी जमा झालेले शैक्षणिक साहित्य सर्वच समाजातील गरीब विद्यार्थ्यांना देण्यात येईल. अशा प्रकारे गरजूंच्या शिक्षणाला हातभार लागेल. यंदा हे अभियान चेंबूर पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामागील महामानव प्रतिष्ठानतर्फे राबविले जात आहे.
चैत्यभूमीवरील शिवाजी पार्क या ठिकाणी भीम आर्मी तसेच फॅम या संघटनांतर्फे अभियान चालविण्यात येणार आहे. आंबेडकरी जनता तसेच ज्यांना अभियानात सहभाग नोंदविण्याची इच्छा असेल त्यांनी चेंबूर व शिवाजी पार्क येथे हे साहित्य आणावे, असे झनके यांनी सांगितले.

Web Title: Instead of ful, the same-pen will pay the vowi honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.