Join us

नाणारबाबत नेत्यांऐवजी जनतेच्या शंका दूर करणार, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

By यदू जोशी | Published: May 20, 2018 1:34 AM

मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला; विदर्भासाठी वेगळ्या रिफायनरीची राज्याची केंद्राकडे मागणी

मुंबई : कोकणातील नाणार तेल रिफायनरी प्रकल्पाबाबत काही नेत्यांनी घेतलेल्या शंका या राजकीय स्वरूपाच्या असल्याने त्या दूर करणे कठीण आहे. जनतेच्या शंका खऱ्या असल्या तरी त्या चुकीच्या गृहीतकांवर आधारित असल्याने वस्तुस्थिती मांडून त्या दूर केल्या जातील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह या प्रकल्पाला विरोध करणा-यांना उत्तर दिले. ते ‘लोकमत’शी बोलत होते.

नाणारमधील रिफायनरी प्रकल्प हा विदर्भात हलविणे शक्य नाही. कारण तो समुद्रालगतच होणे अत्यावश्यक आहे. अन्यत्र तो होऊच शकत नाही. विदर्भासाठी वेगळा इनलँड रिफायनरी प्रकल्प उभारावा, अशी मागणी आपल्या सरकारने आधीच केंद्राकडे केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी लोकमतला सांगितले.कोणत्याही नेत्याचे नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेला विश्वासात घेऊनच नाणार प्रकल्पाची उभारणी केली जाईल. ही प्रक्रिया सुरू असून त्याला स्थानिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोस्टल व इनलँड अशा दोन प्रकारच्या रिफायनरी असतात. नाणारमध्ये येऊ घातलेला प्रकल्प हा कोस्टल रिफायनरीचा आहे. इनलँडपेक्षा तो कितीतरी पट मोठा असतो. या प्रकल्पामुळे देशांतर्गत तेलाची गरज भागवून भारत हा निर्यात करण्याच्या परिस्थितीत येईल. युद्धजन्य परिस्थितीत किमान सहा महिन्यांचा तेलसाठा देशाकडे राहील. ही दूरदृष्टी बाळगून नाणारचा प्रकल्प उभारायचा आहे.

या प्रकल्पामुळे कोकणातील आंबा व इतर पिके नष्ट होतील ही शंका अनाठायी आहे. जामनगरमध्ये रिलायन्सचा रिफायनरी प्रकल्प आहे आणि तेथे आंब्याचे मोठे उत्पादन होऊन निर्यातदेखील होते. कोकणात प्रदूषण मोठ्या प्रमाणात येईल, ही शंकाही योग्य नाही. मुंबईत चेंबूरला इतकी वर्षे रिफायनरी आहे. तेथे कोणते प्रदूषण वाढले आणि बळी गेले? अन् नाणारमधील प्रकल्प तर अत्याधुनिक असल्याने प्रदूषणाचा प्रश्नच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.मग समुद्र विदर्भात न्यावा लागेलकोकणात रिफायनरीला विरोध होत असेल तर तो प्रकल्प विदर्भात न्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, वाहतूक आणि अन्य घटकांचा विचार करता हा विशाल प्रकल्प समुद्रकिनारीच होणे आवश्यक व व्यवहार्य आहे. तो विदर्भात करायचा तर मग समुद्रही विदर्भात न्यावा लागेल, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपाच जिंकणारगोंदिया-भंडारा आणि पालघरची लोकसभा पोटनिवडणूक भाजपाच जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, जनतेने गेल्या चार वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचे काम बघितले आहे. त्यांच्या नेतृत्वावरील मतदारांचा विश्वास पोटनिवडणुकीत दिसेल.

टॅग्स :नाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे