लग्नाऐवजी करावी लागली सरणाची तयारी, भाविकांना वाचविण्याच्या नादात गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:06 AM2018-04-04T05:06:57+5:302018-04-04T05:06:57+5:30
साखरपुड्याच्या तयारीसाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी त्याने मुंबई गाठली. गावाकडे मांडव सजला. अशातच मुलाच्या लग्नाऐवजी कुटुंबीयांवर त्याच्या सरणाची तयारी करण्याची वेळ ओढवल्याची मन हेलावणारी घटना मंगळवारी दादरमध्ये घडली.
मुंबई - साखरपुड्याच्या तयारीसाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी त्याने मुंबई गाठली. गावाकडे मांडव सजला. अशातच मुलाच्या लग्नाऐवजी कुटुंबीयांवर त्याच्या सरणाची तयारी करण्याची वेळ ओढवल्याची मन हेलावणारी घटना मंगळवारी दादरमध्ये घडली. संकष्टीमुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागली. याच रांगेतील भाविकांना अचानक लोखंडी पायपामधून विजेचा धक्का बसल्याचा प्रकार समोर आला. इलेक्ट्रिशियन म्हणून त्याने बचावासाठी पुढाकार घेतला; आणि त्याच लोखंडी खांबातील विजेच्या धक्क्यामुळे त्याच्यावर मृत्यू ओढवला. या प्रकरणी दादर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या नसीम अली बेचैन अली (२४) हा आई आणि तीन भावांसोबत राहायचा. मे महिन्यात तेथीलच मुलीसोबत त्याचा साखरपुडा ठरला होता. त्यापाठोपाठ लग्नाची तारीखही ठरली होती. साखरपुड्याच्या तयारीसाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी त्याने सहा महिन्यांपूर्वी मुंबई गाठली. मुंबईत मनीष डेकोरेटरकडे इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरीला लागला. दादरच्या सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात मनीष डेकोरेटरकडून काम सुरू होते. संकष्टी असल्याने सोमवारी रात्रीपासून मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यरात्री २च्या सुमारास मंदिराच्या मागच्या बाजूस रांग नियंत्रित करण्यासाठी लावलेल्या लोखंडी पाइपमध्ये विद्युत प्रवाह वाहत होता. त्यामुळे रांगेत उभ्या भाविकांनाही पायपाला हात लावताच विजेचा धक्का बसला. त्यांनी याबाबत तेथे काम करीत असलेल्या अलीला सांगितले. त्यानंतर अलीने दुरुस्तीसाठी पायपाकडे धाव घेतली. त्याच पायपाला तो चिकटला. विजेच्या धक्क्याने तो बेशुद्ध झाला. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.
दुसरीकडे गावाकडे त्याच्या साखरपुड्यासाठी लगबग सुरू झाली होती. एप्रिल महिनाअखेर अली गावाला परतणार होता. त्यानेही लग्नाची स्वप्ने रंगवली होती. मात्र सोमवारी ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांना धक्का बसला. लग्नाच्या तयारीऐवजी मुलाच्या सरणाची तयारी करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आहे. मंगळवारी रात्रीच्या गाडीने अलीचा मृतदेह घेऊन त्याचा भाऊ गावी निघाला आहे. अलीच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तसेच ज्या मुलीसोबत त्याचा विवाह ठरलाय ती मुलगीही सध्या मानसिक धक्क्यात आहे.
डेकोरेटरविरुद्ध गुन्हा दाखल
दादर पोलिसांनी मनीष डेकोरेटरचा मालक मनीष गुप्ताविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने सुरक्षेची कुठलीच खबरदारी न घेतल्यामुळे अलीला जीव गमवावा लागल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.