मॉडेलऐवजी तिला ‘बनवले’ वारांगना
By admin | Published: July 24, 2016 03:38 AM2016-07-24T03:38:08+5:302016-07-24T03:38:08+5:30
चित्रपटात नृत्यांगनेचे काम तसेच मॉडेल बनवण्याचे प्रलोभन दाखवून मध्य प्रदेशमधील एका १७ वर्षांच्या मुलीला आग्रा व मीरा रोड येथे वेश्या व्यवसायास भाग पाडल्याचा प्रकार उघड झाला
मीरा रोड : चित्रपटात नृत्यांगनेचे काम तसेच मॉडेल बनवण्याचे प्रलोभन दाखवून मध्य प्रदेशमधील एका १७ वर्षांच्या मुलीला आग्रा व मीरा रोड येथे वेश्या व्यवसायास भाग पाडल्याचा प्रकार उघड झाला आहे. घरात डांबून ठेवलेल्या त्या मुलीने धाडस दाखवून पळ काढत रिक्षाचालक व नागरिकांच्या मदतीने पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे तिची सुटका झाली. दरम्यान, याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी मायलेकास अटक केली आहे.
मध्य प्रदेशच्या विभारी जिल्ह्यातील मुलगी बँकेत पैसे काढण्यासाठी गेली होती. त्या वेळी तेथील एका तरुणाने तिच्या सौंदर्याचे कौतुक करत चित्रपटात नृत्यांगनेचे काम तसेच मॉडेल बनवण्याचे प्रलोभन दाखवून तिला फूस लावून पळवून नेले. त्याने तिला आग्रा येथील सोनी सिंह या महिलेस विकले.
सोनीने तिला बळजबरीने वेश्या व्यवसाय करायला लावले. त्यानंतर, महिनाभराने तिला मीरा रोडच्या शांती पार्कमध्ये राहणाऱ्या संजय सिंह (३५) याला विकले. तीन महिन्यांपासून संजय व त्याची आई सरोज (६५) हे मुलीला वेश्या व्यवसायासाठी पाठवत होते. मायलेकाने मुलीला विकण्याचा घाट घातला होता.
त्रासलेल्या मुलीला याची कुणकुण लागली. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी संजय व सरोज बाहेर गेल्याची संधी साधून मुलीने धाडसाने घरातून पळ काढला. एका रिक्षाचालकास गाठून तिने मदतीची विनंती केली.
रिक्षाचालकाने तिला त्याच्या परिचयातील स्थानिक पत्रकार संदीप झा यांच्या कार्यालयात नेले. झा याने रिक्षाचालक व तिला घेऊन मीरा रोड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत संजय व सरोज यांना अटक केली.
(प्रतिनिधी)
संजय आणि सरोज यांनी अशा पद्धतीने किती मुलींची फसवणूक केली, त्यांना वेश्या व्यवसायास भाग पाडले, त्यांची विक्री केली, याचा तपास मीरा रोड पोलीस करत आहेत. त्यांच्या चौकशीतून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.