‘महामोर्चा’ऐवजी ट्वीट केला ‘मराठा मोर्चा’चा व्हिडीओ, राऊतांवर सर्व स्तरांतून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 07:45 AM2022-12-20T07:45:04+5:302022-12-20T07:46:29+5:30
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘महामोर्चा’ ऐवजी मराठा मोर्चाचा फोटो ट्वीट केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘महामोर्चा’ ऐवजी मराठा मोर्चाचा फोटो ट्वीट केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मराठा मोर्चा, संभाजीराजे यांच्यासह सर्वच स्तरांतून झालेल्या टीकेनंतर राऊत यांनी दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते, आपण कुठेही हा व्हिडीओ महामोर्चाचा असल्याचे म्हटले नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे.
राऊत यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये ‘देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही.’ असे म्हटले होते. राऊत यांनी टि्वट केलेला हा व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा दावा करीत मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला.
संभाजीराजे यांनीही व्हिडीओ स्वत:च्या राजकारणासाठी वापरताना जरा तरी तमा बाळगा, अशा शब्दांत राऊत यांना सुनावले. तर, मोर्चा मोठा नव्हताच त्यामुळे दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मराठा क्रांती मोर्चाकडून तर या अधिवेशनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन राऊत यांच्या अटकेची मागणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.