मुंबई : वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या मुख्यालयाच्या इमारतीचा आता पुनर्विकास न होता दुरुस्ती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या दुरुस्तीसाठी पंधरा कोटी रुपयांचा खर्च येणार असून याबाबतचा प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.
म्हाडाच्या वांद्रे येथील इमारतीमधून राज्यभरातील म्हाडाच्या मंडळांचा कारभार चालवला जातो. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घरे बांधण्याची जबाबदारी राज्य सरकारने सध्या म्हाडावर सोपवली आहे. यासह म्हाडाने बीडीडी चाळींचा पुनर्विकास, धारावी पुनर्विकास असे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामुळे या ठिकाणी दररोज हजारो नागरिक आपल्या कामांसाठी येत असतात.येणाºया नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन दुरवस्था झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी सुसज्ज असा टॉवर उभारण्याचा म्हाडाचा मानस होता. म्हाडाने पवई आयआयटीच्या तज्ज्ञांकडून इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेतले. त्यामध्ये इमारत दुरुस्तीचा पर्याय सुचवण्यात आला. यामुळे म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासाचा विषय मागे पडला.
म्हाडाच्या इमारतीतील अनेक भागांत पाणी झिरपल्यामुळे आतील स्टील गंजल्याचे चित्र आहे. शिवाय बाथरूम आणि पाण्याच्या टाक्या असलेल्या भागाचे अधिक नुकसान झाल्याचे पाहणीत आढळून आले. त्यामुळे या भागावर अधिकाधिक लक्ष देत दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केले जाणार असून कंत्राटदाराकडून किमान वीस वर्षांची इमारतीला कसलीच हानी होणार नाही, अशी हमी घेतली जाणार आहे. सध्या पुनर्विकास जरी लांबला असला तरी लवकरच आर्किटेक्ट नेमून त्याच्या सल्ल्यानुसार आराखडा तयार करूनघेतला जाईल व त्यानंतरच इमारतीच्या पुनर्विकासाचा विचार केला जाईल.इमारत ४३ वर्षे जुनीम्हाडाची पाच मजली असलेली ही इमारत ४३ वर्षे जुनी असून २२ सप्टेंबर १९६६ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २७ जून १९६९ रोजी बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले होते. ४३ वर्षांपूर्वी या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे ७० लाख ५० हजार इतकाच खर्च आला होता.