मच्छीमारांच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी सरकार त्यांच्यावर अन्याय करत आहे - देवेंद्र तांडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:09 AM2021-08-24T04:09:08+5:302021-08-24T04:09:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजारावर आणि दादर येथील मासळी बाजारावर ...

Instead of solving the problems of fishermen, the government is doing them injustice - Devendra Tandel | मच्छीमारांच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी सरकार त्यांच्यावर अन्याय करत आहे - देवेंद्र तांडेल

मच्छीमारांच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी सरकार त्यांच्यावर अन्याय करत आहे - देवेंद्र तांडेल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजारावर आणि दादर येथील मासळी बाजारावर पालिकेतर्फे हातोडे चालवले गेले आहेत. मासळी विक्रेते उघड्यावर पडले आहेत. त्याविरोधात २५ ऑगस्ट रोजी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयासंदर्भात मागील दोन महिन्यांपासून आमच्या सातत्याने बैठका व पत्रव्यवहार सुरू आहेत; मात्र सरकार आमच्याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे. यामुळे आमच्या मागण्यांसंदर्भात सरकारला गांभीर्य देखील नसल्याचे दिसून येत आहे. अशा भावना देवेंद्र दामोदर तांडेल यांनी ‘लोकमत’ सोबत बोलताना व्यक्त केल्या.

मच्छीमारांसाठी क्रॉफर्ड मार्केट महत्त्वाचे का आहे?

- क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुमारे ३०० मासळी विक्रेत्यांचा व्यवसाय चालतो. ज्याप्रमाणे भाज्यांसाठी नवी मुंबईचे एपीएमसी मार्केट आहे त्याचप्रमाणे हे मासळीसाठीचे हे मार्केट आहे. ठाणे, रायगड, पालघर व रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार या मार्केटमध्ये मासे आणतात. इथे मासे संकलन आणि वितरण या दोन्ही गोष्टी होतात. जर या मासे विक्रेत्यांना ऐरोलीला स्थलांतरित केले तर शंभर वर्षांपासून सुरू असणारी मासेविक्रीची साखळी संपुष्टात येईल. २०१७ साली प्रशासनाने क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजाराचे आरक्षण काढून टाकले. यामुळे सरकारला येथे मासळीबाजार नकोच असे दिसून येत आहे. फुले मंडईत मच्छीमारांना कायमस्वरूपी जागा देण्याचे सांगण्यात येत आहे. ती जागा अपुरी आहे. तेथील व्यापाऱ्यांचा याला विरोध आहे. तेथे मासळी बाजाराचे आरक्षण पुन्हा देण्यात यावे.

दादर मासळी मार्केट विषयी तोडगा काय?

- दादर मासळी मार्केट हे गोड्या पाण्यातील माशांचे संकलन आणि वितरणाचे केंद्र आहे. या मार्केटमधून अस्वच्छता व दुर्गंधी पसरत असल्यास त्याची जबाबदारी विक्रेत्या एवढीच महानगरपालिकेची सुद्धा आहे. परंतु ज्या पद्धतीने ते मार्केट तोडण्यात आले आहे आणि त्यानंतर महिलांना ऐरोली येथे स्थलांतरित होण्यास सांगण्यात येत आहे हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे या विक्रेत्यांचा ग्राहक त्यांच्यापासून तुटला जाऊ शकतो. त्यांना स्थलांतरित न करता वेंगुर्ल्याच्या धरतीवर तेथे अत्यंत सुसज्ज असे मार्केट उभारण्यात यावे. येथील दुर्गंधीचा त्रास दूर होऊ शकतो.

कोळीवाडे आणि गावठाण विषयावर आपली मागणी काय

- मुंबईतील कोळीवाडे झोपडपट्ट्या नाहीत. सरकारने कोळीवाड्यांना गावठाणाचा दर्जा द्यायला हवा. आमचे २४० कोटींचे हक्काचे परतावे आम्हाला त्वरित दिले पाहिजे. यासोबत मुंबईत झालेल्या चक्रीवादळाने देखील मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. सरकारतर्फे देण्यात आलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे त्याने कोणाचेही पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे आर्थिक मदत द्या किंवा शेतकऱ्यांप्रमाणे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्या

सत्ताधारी मुंबईतील भूमिपुत्रांवर दुर्लक्ष करत आहेत का

- आमचा रोख कोणत्याही पक्षाविरोधात नाही. आमच्यावर आलेल्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही मोर्चाचे आयोजन केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची या समस्या सोडविण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. यामुळे त्यांची स्वतःची व त्यांच्या पक्षाची देखील बदनामी होत आहे. याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी.

Web Title: Instead of solving the problems of fishermen, the government is doing them injustice - Devendra Tandel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.