मनोहर कुंभेजकर
मुंबई : कोरोना महामारीत रुग्णसेवा देतांना मृत्यू पावलेल्या सरकारी व खाजगी डॉक्टरांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 50 लाखांचा विमा कवच देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केल्यावर,हा विमा खाजगी डॉक्टरांना लागू केल्याचे परिपत्रक राज्य सरकारने गेल्या दि,20 ऑगस्टला जाहीर केले होते.
मात्र सदर खाजगी डॉक्टरांना ते सरकाराच्या अंतर्गत कोरोना रुग्णालयात सेवा देत नसल्याचे कारण पुढे करत त्यांना विमा कवच राज्य सरकार नाकारत असल्याची तक्रार मृत डॉक्टरांचे कुटुंबिय करत आहेत. प्रत्यक्षात सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व खाटा कमी पडू लागल्यावर खाजगी डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटलच्या सेवा घेतली. यातील काही डॉक्टर हे कोरोना रुग्णांना सेवा देत नसले तरी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना सेवा देत असतांना संसर्गाने कोरोना बाधीत होऊन त्यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत आपण स्वतः लक्ष घालून रुग्णांना सेवा देतांना मृत पावलेल्या खाजगी डॉक्टरांच्या कुटुंबायांना 50 लाखांचा विमा देय रक्कम देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत अशी मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.
दि,20 ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या आरोग्य सेवा संचालकांनी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार अश्या कोरोना मृत डॉक्टरांच्या कुटुंबायांना विमा कवच नाकारणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे असल्याचे खासदार शेट्टी यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.