लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात पडताळणीच्या अर्जांचे प्रमाण वाढल्याने ऑनलाइन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे ३० डिसेंबर रोजीही राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाइनसह ऑफलाइन अर्जसुद्धा स्वीकारण्याचे निर्देश ‘बार्टी’मार्फत जारी करण्यात आले आहेत.
उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोचपावती मिळावी, गैरसोय होऊ नये याकरिता ३० डिसेंबर रोजीही अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ठिकठिकाणी समितीने अर्जांची संख्या लक्षात घेत अर्ज स्वीकारण्याची खिडकी/कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे. या दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालये सुरू ठेवावीत तसेच ऑफलाइन दाखल केलेल्या अर्जांची माहिती १ जानेवारीपर्यंत ‘बार्टी’कडे लेखी स्वरूपात कळवावी, असे आदेश राज्यातील सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात आल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.