कोविड-१९ संदर्भात विद्यार्थ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 01:30 AM2020-02-23T01:30:43+5:302020-02-23T01:30:51+5:30
केंद्राच्या निर्देशानंतर विभागीय उपसंचालकांना निर्देश
मुंबई : कोविड-१९ (कोरोना) व्हायरस संदर्भात देशातील शालेय शिक्षण विभागातील सर्व समग्र शिक्षा अभियानाच्या प्रकल्प संचालकांना केंद्र सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खबरदारीच्या सूचना घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकल्प संचालकांनी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये कोरोना व्हायरस आणि हा आजार कसा पसरू शकतो? त्यासाठी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे? कोणत्या सवयी विद्यार्थ्यांना आत्मसात करून घ्यायला हव्यात, या संदर्भातील माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात राज्याच्या प्राथमिक संचालनालयाकडूनही तत्काळ दखल घेऊन, विभागीय शिक्षण उपसंचालकांना हा आजार रोखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.
कोरोना व्हायरसमुळे सध्या चीनसह २४ देशांत भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. सदर आजार संसर्गजन्य आहे आणि तूर्त त्यावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने तो पसरू न देण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे. रस्ताही आवश्यक त्या सूचना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला हव्यात, असे निर्देश प्राथमिक शिक्षण सहसंचालक राजेंद्र पवार यांनी विभागीय उपसंचालकांना दिले आहेत.
काय नमूद केले आहे पत्रात?
हात स्वच्छ धुणे, शिंकताना हातरुमालाचा वापर करणे, ताप आल्यास योग्य काळजी घेणे, अशा सवयींबाबत मुलांना/विद्यार्थ्यांना जागरूक करण्याच्या सूचना केंद्राने दिलेल्या पत्रात देण्यात आल्या आहेत. शिवाय जनजागृती करण्यासंदर्भातील, जागरूकता बाळगण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, या संदर्भातील पत्रके शिक्षकांच्या हाती असावे, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.