दक्षिण मुंबईतील दोन शाळा बंद करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 07:17 AM2018-06-24T07:17:22+5:302018-06-24T07:18:03+5:30
अनधिकृत शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे
मुंबई : अनधिकृत शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार, दक्षिण विभागातील क्रॉफर्ड मार्केट येथील मदनी इंग्लिश स्कूल आणि माटुंगा येथील अमुलख अमिचंद इंटरनॅशनल या दोन शाळा अनधिकृत असल्याने, त्या बंद करण्याबाबतच्या सूचना शुक्रवारी शिक्षण विभागाने दिल्या, तसेच अनधिकृत शाळेत पाल्यांना प्रवेश घेऊन न देण्याचे आवाहन पालकांना केले आहे.
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता अथवा ना हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरू करता येत नाही. मात्र, दक्षिण विभागातील मदनी इंग्लिश स्कूल, साबु सिदीक्की मुमसाफिरखा, क्रॉफर्ड मार्केट आणि अमुलख अमिचंद इंटरनॅशनल स्कूल, अहमद किडवाई रोड, माटुंगा या दोन शाळा अनधिकृत सुरू होत्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ खेळणाऱ्या या शाळा बंद करण्याबाबतच्या सूचना शुक्रवारी शिक्षण विभागाने दिल्या. संबंधित शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत, असे शिक्षण निरीक्षक, दक्षिण विभाग यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सदर शाळांच्या व्यवस्थापनाने पालकांशी संपर्क साधून, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या अन्य मान्यताप्राप्त खासगी शाळेत शिक्षणासाठी दाखल करावे व शाळा बंद करावी, जेणेकरून नव्याने प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, पालकांनी आपल्या पाल्यांचे अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहनही शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी केले आहे. सर्वच अनधिकृत शाळा रडारवर असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.