धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:06 AM2021-07-19T04:06:12+5:302021-07-19T04:06:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. मुंबई उपनगर ...

Instructions for immediate evacuation of residents of dangerous homes | धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश

धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. दुर्घटनास्थळी धोकादायक अवस्थेत असलेल्या घरांचे इतरत्र स्थलांतर करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले, तसेच नैसर्गिक आपत्तीच्या अशा प्रसंगी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन दुर्घटनाग्रस्तांना दिलासा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री ठाकरे यांनी आज चेंबूरमधील भारतनगर, विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत मुत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले, तसेच परिसरातील रहिवाशांची भेट घेऊन त्यांनी शासनामार्फत सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार रमेश कोरगावकर, सुनील राऊत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

ठाकरे यावेळी म्हणाले की, कमी काळात २०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवली. दुर्घटनास्थळी पोहोचणे कठीण असतानाही बचाव पथकांनी अनेक अडचणींचा सामना करीत मदतकार्य सुरू केले आहे. मिठी नदीची पातळी वाढल्याने तेथेही किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. कमी वेळेत अधिक पाऊस पडत असल्याने मुंबईत ज्या ठिकाणी पाणी साचून समस्या निर्माण होतात तेथे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. यासाठी पाणी साठवणाऱ्या मोठ्या भूमिगत टाक्या बांधल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान विभागाने मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेता रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.

Web Title: Instructions for immediate evacuation of residents of dangerous homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.