लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकरांसाठी पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जागतिक पातळीवरून लस खरेदीची शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. मुंबईतील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या लसीसाठी स्मार्टफोनद्वारे संबंधित ॲपवर नोंदणी करावी लागते, पण ज्यांना ॲप वापरता येत नाही अशा नागरिकांनाही लस सुलभपणे मिळावी यासाठी एक पद्धती तयार करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय मुंबईची लसींची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्रे वाढविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र तर विभागात एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरू आहे. गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण माेहीम राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही साेमवारी महापालिकेने जारी केल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. राज्यातील इतर सर्व शहरांनीही ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सुलभ लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्या त्या शहरांमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीम घ्यावी, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
...............................