मुंबई : मानवतेच्या दृष्टिकोनातून उच्च न्यायालयाने २१ दिवसांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या आईची जामिनावर सुटका केली. आरोपी आणखी एका दोन वर्षांच्या मुलीची आई आहे आणि ही मुलगी गेले कित्येक महिने आईशिवाय राहत आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सोमवारी आरोपीची जामिनावर सुटका केली.मीना जैस्वालने फेब्रुवारीमध्ये तिच्या २१ दिवसांच्या मुलीची हत्या केल्याचा गुन्हा पवई पोलिसांनी नोंदवला. तेव्हापासून ती कारागृहातच आहे. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर मीना जैस्वालने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. याचिकेनुसार, २१ दिवसांच्या मुलीची हत्या किती वाजता करण्यात आली, याची माहिती शवविच्छेदन अहवालात नाही. कारण मुलीचा ताबा एकट्या आईकडे नव्हता. मुलीचा मृत्यू झाला हे समजण्यापूर्वी घरात मुलीचे बाबा, आजी व नणंदही होत्या.एखाद्या महिलेने फाशीची शिक्षा सुनावण्यासारखा गंभीर गुन्हा केला असला तरी तिला कारागृहात ठेवले जाऊ शकत नाही. खटल्याला सामोरे जाण्याची व शिक्षा सुनावल्यास ती भोगण्याची तयारी संबंधित महिलेने दर्शवली तर तिची जामिनावर सुटका करावी, असे फौजदारी दंडसंहिता ४३७मध्ये नमूद करण्यात आले आहे. अर्जदार आणखी एका दोन वर्षांच्या मुलीची आई आहे. ही मुलगी कित्येक महिने आईशिवाय राहत आहे, असा युक्तिवाद मीना जैस्वाल यांच्या वकिलांनी न्या. ए. एम. बदर यांच्यापुढे केला. तसेच तिच्या नवºयाने व सासूनेही ती खटल्यास व शिक्षेला सामोरे जाईल, असे न्यायालयाला सांगितले. त्यांचे म्हणणे विचारात घेत न्यायालयाने मानवतावादी दृष्टीकोन ठेवत दोन वर्षांच्या मुलीसाठी अर्जदाराची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक बाँडवर सुटका केली.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खुद्द अर्जदाराच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार अर्जदार दुसरीही मुलगी झाली म्हणून नाराज होती. घटनेच्या दिवशी आरोपी घरातच होती. तिचा पती रात्री ८ वाजेपर्यंत घराबाहेर होता. तर सासू आणि नणंद साडेनऊ वाजता घरी आल्या. त्या वेळी आरोपीने चिमुरडीला दूध पाजण्यासाठी जवळ घेतले. मात्र मुलीचे अंग थंड पडले होते. आरोपीने याची माहिती नवरा व सासूला दिली. डॉक्टरांकडे नेल्यावर त्यांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मुलीच्या शववविच्छेदनात तिच्या डोक्यावर जखम करण्यात आली व त्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी अहवालात नमूद केले.
मुलीची हत्या करणा-या आईला जामीन, मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 5:36 AM