Join us

‘विधि’च्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 3:41 AM

शासकीय महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या (लॉ) तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश शनिवारी मुंबई विद्यापीठाच्या ‘बोर्ड आॅफ स्टडिज’ने दिले. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई  - शासकीय महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या (लॉ) तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश शनिवारी मुंबई विद्यापीठाच्या ‘बोर्ड आॅफ स्टडिज’ने दिले. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.विधि अभ्यासक्रमाच्या (३ व ५ वर्षे) विद्यार्थ्यांच्या अंतर्गत पुनर्परीक्षा या विधि महाविद्यालयाकडून घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना एक संधी मिळते व वर्ष वाया जात नाही. परंतु शासकीय विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य सुवर्णा केवले यांनी तडकाफडकी ही अंतर्गत गुणांची फेरपरीक्षा रद्द केली. याच प्राचार्यांनी गेल्या वर्षी या परीक्षा घेतल्या होत्या. या निर्णयामुळे सुमारे २७० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. याविरोधात स्टुडंट लॉ कौन्सिल संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती.विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांना एक संधी देण्यासाठी अंतर्गत फेरपरीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात यावी, असे निवेदन युवासेनेकडून प्राचार्यांना देण्यात आले होते. तसेच पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अंतर्गत पुनर्परीक्षांच्या संदर्भात स्पष्ट माहिती देण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होणार नाही व ते मानसिकदृष्ट्या तयार राहतील, अशी मागणीही केली होती.दरम्यान, आता शासकीय महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या (लॉ) तिस-या वर्षाच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठाच्या ‘बोर्ड आॅफ स्टडिज’ने दिले आहेत.उद्या निषेध आंदोलनपुनर्परीक्षेचे आदेश मुंबई विद्यापीठाच्या ‘बोर्ड आॅफ स्टडिज’ने दिले असले तरी या आदेशाचे पालन करायचे की नाही, यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार महाविद्यालयांनाच आहे. महाविद्यालये पुनर्परीक्षा घेण्यास टाळाटाळ करू शकतील, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळेच याविरोधात महाविद्यालयाचा निषेध करण्यासाठी विधि महाविद्यालयातील विद्यार्थी सोमवारी, ६ मे रोजी मुंबई विद्यापीठातील फोर्ट कॅम्पसमध्ये निषेध आंदोलन करणार आहेत.

टॅग्स :परीक्षामुंबई विद्यापीठशिक्षण क्षेत्र