‘त्या’ मुलीच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:26 AM2018-06-27T06:26:42+5:302018-06-27T06:26:45+5:30
१९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील फरार आरोपीच्या मुलीच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केंद्राला गेल्या आठवड्यात दिला.
मुंबई : १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील फरार आरोपीच्या मुलीच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केंद्राला गेल्या आठवड्यात दिला.
फरारी आरोपी अब्दुल गनी गाझीची मुलगी सना मुझम्मिल माजीद हिच्या हालचालींवर प्रतिबंध न घालता, तिच्या पासपोर्टच्या नूतनीकरणाचा आदेश न्या. आर.एम. सावंत व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने दिला. केंद्र सरकारने सादर केलेल्या अहवालात तिच्याविरुद्ध काहीही नाही. केवळ ती १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील फरार आरोपीची मुलगी आहे, असे म्हणत न्यायालयाने माजीदचा पासपोर्ट नूतनीकरणाचा अर्ज मंजूर केला.
माजीदच्या अर्जानुसार, ती भारतीय नागरिक आहे. मात्र, ती सध्या दुबईत राहते. तेथे बँकेत नोकरी करत असून, तिचा पती ‘गल्फ न्यूज’ या वर्तमानपत्रात पत्रकार आहे. पासपोर्ट प्राधिकरणाने तिला केवळ भारत ते यूएई या दरम्यानच प्रवास करण्याची मुभा दिली. मात्र, हे निर्बंध हटवून जगात कुठेही प्रवासाची परवानगी द्यावी, अशी विनंती तिने अर्जाद्वारे केली. मात्र, पासपोर्ट प्राधिकरणाने आक्षेप घेतला. ‘तिच्या वडिलांची ओळख लक्षात घेऊन व गुप्तचर विभागाची माहिती पाहता, तिच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत,’ असे सांगत अॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयापुढे गुप्तचर विभागाचा अहवाल सादर केला.
तो वाचल्यावर न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्ती १९९३ च्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपीची मुलगी आहे, याशिवाय या अहवालात काहीच नाही, शिवाय बॉम्बस्फोट झाला, तेव्हा ती लहान होती.