Join us

नालेसफाई वेगाने करण्याचे निर्देश

By admin | Published: June 06, 2016 1:44 AM

नालेसफाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले असतानाच पावसाळ्यापूर्वी पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या सफाईची कामे वेगाने पूर्ण करण्यात यावीत

मुंबई : नालेसफाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले असतानाच पावसाळ्यापूर्वी पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या सफाईची कामे वेगाने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश महापालिकेच्या स्थापत्य समितीचे (उपनगर) अध्यक्ष अनंत नर यांनी प्रशासनाला दिले. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी नर यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमवेत केली. त्या वेळी ते बोलत होते.एस व टी विभागातील कांजूरमार्ग येथे मनसुखबेन नगराजवळील क्रॉम्प्टन नाल्यापासून पाहणी दौऱ्याची सुरुवात झाली. भांडुप (पूर्व) रेल्वे स्थानकालगतच्या दातार कॉलनी नाल्यातील खोलवर गाळ काढण्याचे निर्देश आमदार सुनील राऊत यांनी या वेळी दिले. मेमन महाविद्यालयाच्या शेजारून वाहणाऱ्या दातार नाल्यात असलेला कचरा व तत्सम अडथळे काढून टाकण्याच्या सूचना अनंत नर यांनी केल्या. उषानगर नाल्याची रेल्वेच्या हद्दीतील रेल्वे रुळांखालून पूर्णपणे स्वच्छता झाली आहे, याची खातरी रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय साधून करावी, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. नाहूर येथील बॉम्बे आॅक्सिजन नाला, मुलुंड पश्चिमेकडील वीणानगर नाला, जवाहर टॉकीज नाला, तांबेनगर या नाल्यांचीही पाहणी करण्यात आली.पी/उत्तर, आर/दक्षिण व आर/उत्तर विभागांपैकी पी/उत्तर विभागातील कुरार गाव येथे आप्पापाडा येथील महाराष्ट्रनगर नाल्याची पाहणीही करण्यात आली. हा नाला वनविभागाच्या हद्दीवर असून, त्याची लांबी सुमारे ३०० मीटर असल्याची माहिती प्रशासनाने लोकप्रतिनिधींना दिली. या वेळी हा नालाही लवकरात लवकर साफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिवाय कुरारगाव येथील पारेखनगर नाला, आर/दक्षिण विभागात मालाड येथे वळनई नाला, लालजीपाडा येथे पोईसर नदी, आर/उत्तर विभागात दहिसर नदी, तावडे नाला, गोवन नाल्याची पाहणी करण्यात आली.