मुंबईत पावसाच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 13:52 IST2023-06-28T13:52:30+5:302023-06-28T13:52:43+5:30
आपल्या विभगातील सब वे भागावर अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवावे, असे सांगत शहरातील कोणत्याही भागात आपण भेटून पाहणी करणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत पावसाच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
मुंबई : आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचले आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व वॉर्ड प्रमुख अधिकारी, विभाग उपायुक्त आणि मलनिःसारण अधिकारी यांना मुंबई महानगर पालिका आयुक्तांकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपल्या विभागातील ज्या सखल भागात पाणी साठण्याच्या किंवा तुंबण्याची शक्यता आहे तेथे प्रत्यक्ष जाऊन आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करण्याच्या सूचना सर्व सबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, आवश्यकता असल्यास त्या भागातील उपसा पंप ही तात्काळ कार्यान्वित करण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले आहे. या दरम्यान आपल्या विभगातील सब वे भागावर अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवावे, असे सांगत शहरातील कोणत्याही भागात आपण भेटून पाहणी करणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर पाहायला मिळत आहेत. तसेच ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्हात देखील जोरदार पाऊस सुरु आहे.