वेळ अपुरी, प्रवास साधने नाहीत, पण व्यवसाय सुरू झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:14+5:302021-06-09T04:08:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा कहर काही प्रमाणात कमी झाल्यानंतर आता सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा कहर काही प्रमाणात कमी झाल्यानंतर आता सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. याआधी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ यावेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे व्यापारी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र अनलॉक करूनही दुकाने सुरू ठेवण्यास असलेली अपुरी वेळ, तसेच व्यापाऱ्यांना व दुकानातील कर्मचाऱ्यांसाठी प्रवासाची साधने नसल्यामुळे त्यांची काहीशी निराशाही झाली. त्यामुळे एकीकडून दुकानदारांना दिलासा मिळाला असला तरी रेल्वेने प्रवासाची मुभा नसल्याने ते निराश आहेत. व्यापाऱ्यांना व दुकानातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी व्यापारी वर्ग करत आहे.
- अनिल फोंडेकर (अध्यक्ष, मुंबई व्यापारी असोसिएशन)
दुकाने खुली व बंद करण्यास घालून दिलेली वेळ चुकीची आहे. दूध, किराणामाल यांसारखी दुकाने लवकर उघडता येऊ शकतात. मात्र कपडे तसेच इलेक्ट्रॉनिक व हार्डवेअर यांसारखी दुकाने ११ वाजता उघडली जातात. त्यात रेल्वे प्रवासाची परवानगी नाही व अपुरी दळणवळणाची साधने यामुळे व्यापाऱ्यांना दुकानावर पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे अशी दुकाने ४ वाजता बंद केल्यास त्याचा दुकानदारांना काहीच फायदा होणार नाही. सरकार अशा प्रकारचे निर्णय घेताना तळागाळातील लोकांचा विचार करत नाही. व्यापाऱ्यांच्या अडचणी अद्याप सरकारला समजलेल्याच नाहीत.
- दत्तात्रय तावरे (दुकानदार, देवनार)
दोन महिन्यांनंतर सरकारने दुकान उघडण्यास परवानगी दिल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इतके दिवस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला अद्यापही पूर्ण वेळ दुकाने उघडण्यास परवानगी नाही. वेळेची बंधने आहेत. त्यात सार्वजनिक वाहतुकीवरदेखील प्रवासाचे निर्बंध आहेत. असे असले तरी काहीतरी जुळवाजुळव करून दुकाने सुरू ठेवावी लागणारच आहे.
- अभयराज कुशवाह (दुकानदार, कुर्ला)
सरकारने अनलॉक केल्यानंतर लोकल प्रवासाचीही मुभा द्यायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. दुकाने खुली करण्यास परवानगी दिल्यामुळे आता व्यवसाय पुन्हा एकदा रुळावर आणायचा आहे. यासाठी दुकानातील कर्मचारीही नियमित दुकानावर पोहोचायला हवा, केवळ बस, रिक्षा व टॅक्सी यातून दररोज प्रवास करणे अडचणीचे आहे. त्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यायलाच हवी.
..............................................................