Join us

बाळासाहेबांचा अपमान हाच मुद्दा

By admin | Published: October 21, 2015 3:16 AM

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील टीकेचा मुद्दा कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात तापवण्याचे प्रयत्न शिवसेनेने सुरु केले आहेत.

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील टीकेचा मुद्दा कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात तापवण्याचे प्रयत्न शिवसेनेने सुरु केले आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शेलक्या शब्दांत टीका करून तसे संकेत दिले आहेत. पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामने खेळण्यास विरोध करण्याची भूमिका शिवसेनेने घेण्यापूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अभिनेता संजय दत्त याला सोडण्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती, अशी टीका शेलार यांनी केली होती. त्याचा समाचार घेताना मंत्री कदम म्हणाले की, शेलार बाळासाहेबांबद्दल बोलतात. कोणाची लायकी काय? कोण काय बोलते? आकाशाकडे पाहून थुंकाल तर ते तुमच्याच तोंडावर पडेल. बाळासाहेबांवर बोलण्याची शेलार यांची लायकी नाही. त्याकरिता त्यांना दहावेळा जन्म घ्यावे लागतील. राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आल्यानंतर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लागलीच असा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. त्या पाठोपाठ शेलार यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने कदम यांनी केलेली टीका हे ‘बाळासाहेबांचा अवमानह्ण हा कडोंमपाच्या निवडणुकीत मुद्दा करून शिवसेनेच्या मतदारांना चेतवण्याची खेळी केली आहे. यामुळे शिवसेनेचा मतदार घराबाहेर पडून भरघोस मतदान करील, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. यापूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘निकालानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे काही महत्त्व उरणार नाही ह्य, असे वक्तव्य केले होते. त्याचा लाभ शिवसेनेला झाला होता. (विशेष प्रतिनिधी)राजकारणापलीकडे जाऊन आदरबाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी यापूर्वी मी कधीही बोललो नाही आणि यापुढेही बोलण्याचा विषय नाही. राजकारणापलीकडे जाऊन आदर करावा अशा व्यक्तींमध्ये ठाकरे यांचा समावेश होतो. रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य हे गैरसमजातून असावे किंवा त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असावी. - आशिष शेलार, अध्यक्ष मुंबई भाजपा