सोसायटीचे वीज कनेक्शन कापण्यासाठी आल्याच्या रागात अभियंत्याला शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:15 AM2021-02-20T04:15:08+5:302021-02-20T04:15:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : थकीत वीज बिल भरले नाही म्हणून सोयायटीचे विद्युत कनेक्शन कापण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : थकीत वीज बिल भरले नाही म्हणून सोयायटीचे विद्युत कनेक्शन कापण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्याला शिवीगाळ करीत अंगावर धावून गेल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला. याप्रकरणी गुरुवारी मुलुंड पोलीस ठाण्यात सोसायटीच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुलुंड पोलिसांनी संबधित उपकार्यकारी अभियंता यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई केली.
गुरुवारी मुलुंड पश्चिमेकडील एका सोसायटीत वीज बिल वसुलीसाठी गेले होते. तेथे पैसे भरत नसल्याने ते विद्युत कनेक्शन कापत असताना, सोसायटीचा विरोध करीत असल्याचा कॉल त्यांना आला. त्यांनी फोनवर त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला.
संबंधित अध्यक्षाने वरिष्ठांकडून मुदत घेतल्याचे सांगितले. मात्र, तरीदेखील बिलाचे अर्धे पैसे भरावे लागतील, असे सांगून अभियंत्याने फोन ठेवून दिला.
दुपारच्या सुमारास संबंधित अध्यक्षाने महावितरण कार्यालयात येत उपकार्यकारी अभियंत्यांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या अन्य ग्राहकांनाही भडकावू लागला. कार्यकारी अभियंत्यांनाही शिवीगाळ केली. तात्काळ पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.