मुंबई - महाराष्ट्रात विशेषत: मुंबईतच अनेकदा माय मराठीचा अवमान झाल्याच्या घटना उघडकीस येतात. काही अमराठी भाषिकांकडून मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देत मराठी माणसांना, मराठीजनांना डिवचण्याचं काम होतंय. आज पुन्हा एकदा अशीच घटना मुंबईतील कुलाबा परिसरात उघडकीस आली आहे. येथील महावीर ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार देऊन महिलेस अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई करून पोलिसांना बोलावून अपमानित केले.
शोभा देशपांडे असे या महिलेचं नाव असून मराठी का बोलत नाहीत, असा प्रश्न विचारल्यामुळे दुकानदाराने पोलिसांच्या मदतीने त्यांना दुकानाबाहेर काढले. त्यामुळे, गुरुवारी सायंकाळ ५ वाजल्यापासून त्यांनी दुकानासमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी अपमानित केले म्हणून, जोपर्यंत मुंबई पोलीस आयुक्त स्वतः येत नाहीत, आणि दुकानदार परवाना दाखवत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याबाबत माहिती मिळताच, मराठी एकीकरण समिती संघटनेचे काही मराठी शिलेदार यांनीदेखील घटनास्थळी जाऊन उपस्थित राहून ही बाब समजून घेतली, पोलिसात तक्रार दाखल करू असे समजावले परंतु त्यांचा पोलिसांवर विश्वास नाही आणि मी इथून हलणारच नाही यावर त्या ठाम असून ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. रात्रीच्या १२ वाजल्यानंतरही त्या दुकानाबाहेरच ठिय्या मांडून बसल्या होत्या.
शोभा देशपांडे या लेखिका असून 'थरारक सत्य इतिहास' आणि 'इंग्रजी इंडिया हाच आपला खरा शत्रू' या दोन पुस्तकांचे संकलन त्यांनी केलंय. शोभाताई मराठी प्रेमी असून त्या मराठीचा नेहमीच आग्रह करत असतात, त्यातुनच सदर दुकानाच्या गुजराती मालकासोबत त्यांचे खटके उडाले, आणि मराठी माणसाचा अपमान केला गेला म्हणून आंदोलन करतेय असे त्यांचे म्हणणे आहे. ७५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या शोभा देशपांडे विना अन्न-पाण्याच्या आंदोलनाला बसल्या आहेत.
पोलिसांनी दुकानदारावर कारवाई करावी तसेच ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी त्यांना अपमानित केले त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी.मराठीचा अपमान होत असताना, मराठी पोलिसांनी देखील मराठी महिलेलाच अपमानित करणे हे निंदनीय आहे. वरिष्ठ पोलिसांनी याघटनेकडे लक्ष घालून त्या महिलेला न्याय मिळवून द्यावा. त्या वयस्कर आहेत त्यांना घरी सुखरूप पोहचविण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.