कोविड सेंटरची पाहणी करायला गेलेल्या आमदाराला अपमानास्पद वागणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 07:04 PM2020-07-30T19:04:02+5:302020-07-30T19:06:07+5:30
पालिका प्रशासनाने आरोपांचे केले खंडन
मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उपनेते डॉ.विनोद घोसाळकर व आमदार,विभागप्रमुख विलास पोतनीस यांनी दहिसर पश्चिम कांदरपाडा येथील कोविड सेंटरचे दि,27 रोजी लोकार्पण केले. मात्र येथे सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारीची शहनिशा करण्यासाठी आणि वैद्यकीय सुविधांची पाहणी करण्यासाठी आज सकाळी गेले असता आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाल्याची तक्रार दहिसर विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार मनीषा चौधरी यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे. या पत्राची प्रत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
याप्रकरणी लोकमतला अधिक माहिती देतांना आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या की,काल रात्री भगवती हॉस्पिटलमधून आपल्या मतदार संघातील प्रभाग क्रमांक 10 मधील एका कोविड रुग्णाला येथील कोविड सेंटर मध्ये शिफ्ट करण्यात आले होते. येथे शौचालयाला पाणी नसून रुग्णांना डायपर देत असल्याची तक्रार त्यांनी काल रात्री 11.30 वाजता केली.त्यामुळे आज सकाळी येथील डॉ.नाईक यांच्या बरोबर तोंडाला मास्क व हातात मोजे घालून येथील प्रसाधनगृहाची पाहणी केली. येथील शौचालयाला पाणी नसल्याने येथे दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य होते अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मेडिसीन सेंटरच्या स्टोअरची पाहणी करायला गेले असतांना,राज नावाच्या व्यक्ती ओरडत आली,आणि तुम्ही येथून निघून जा असे म्हणत सदर व्यक्ती आपल्या अंगावर आल्याची तक्रार त्यांनी पत्रात नमूद केली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गेलेल्या लोकप्रतिनिचा या मतदार संघातील नागरिकांसमोर अपमानस्पद वागणूक देणे ही खेदनीय बाब आहे अशी तक्रार आमदार मनीषा चौधरी यांनी केली आहे.
याप्रकरणी आर उत्तर वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या आरोपांचे खंडन केले. येथे उत्तम सुविधा असून सध्या येथे 13 रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि येथे आयसीयू रुग्ण देखिल असल्याने या कोविड सेंटर मध्ये इतरांना प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे.आणि आमदारांबरोबर जास्त माणसे होती.तर आयसीयू रुग्णाला शौचालयाला जाणे शक्यच नसल्याने त्यांना डायपर देण्यात आले अशी माहिती नांदेडकर यांनी दिली. आज दुपारी अतिरिक्त आयुक्त (शहर) संजय जयस्वाल यांनी व परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सुद्धा या कोविड सेंटरची पाहणी केली अशी माहिती त्यांनी शेवटी दिली.