मुंबई : रुग्णालयांतील उपचारानंतर आरोग्य विम्याच्या रकमेचा परतावा मिळवण्यासाठी उपचारांची मुळ कागदपत्रे विमा कंपनीला सादर करावी लागतात. लाँकडाऊनमुळे त्यावर निर्बंध आले असले तरी स्कॅन कागदपत्रांच्या आधआरे विमा कंपन्यांनी परतावा देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, अनेकांकडे एकापेक्षा जास्त कंपन्यांची पाँलिसी असते. त्यामुळे एकाच उपचाराचा खर्च दोन ठिकाणांहून वसूल केला जाईल अशी भीती आता बहुतांश विमा कंपन्यांना वाटू लागली आहे.
रुग्णाकडे ज्या कंपनीची विमा पाँलिसी त्या कंपनीच्या पॅनलवर जर उपचारासाठी दाखल झालेले रुग्णालय असेल तर कँशलेस पद्धतीने उपचार करणे शक्य होते. मात्र, तसे नसेल तर रुग्णालयाचे बिल अदा करून खर्चाच्या परताव्यासाठी विमा कंपनीला क्लेम सादर करावे लागतात. त्यात रुग्णालयात दाखल केलेल्या केस पेपरपासून ते डिश्चार्ज कार्ड पर्यंतच्या प्रत्येक कागदपत्राची मुळ प्रत देणे बंधनकारक आहे. लाँकडाऊनमुळे रुग्ण आणि विमा कंपनीच्या एजंटला प्रत्यक्ष भेटणे अवघड झाले आहे. तसेच, मुळ कागदपत्रांची फाईल विमा कंपनीच्या कार्यालयात सादर करणेही शक्य नाही. त्यामुळे ही कागदपत्रे स्कॅन करून ई मेलव्दारे मागवली जात आहेत. त्यांची तपासणी करून योग्य तो परतावा कंपन्या देत आहेत.
सध्या अनेक जणांकडे वैयक्तिक आणि काँर्पोरेट कंपनीत कार्यरत असेल तर तिथलीसुध्दा विमा पाँलिसी असते. त्याशिवाय एकापेक्षा जास्त कंपन्यांच्या वैयक्तिक पाँलिसी घेण्याचे प्रमाणही खूप आहे. यापैकी काही रुग्णांनी किंवा त्यांच्या एजंटनी लाँकडाऊन काळातील सवलतींचा फायदा घेत स्कॅन काँपी एकापेक्षा जास्त कंपन्यांकडे पाठवून परतावे मिळाले तर विमा कंपन्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. प्रत्येक जण असे करेलच असे नाही. मात्र, संभाव्य धोका ओळखून विमा कंपन्या सतर्क झाल्याची माहिती विविध विमा कंपन्यांसाठी कार्यरत असलेल्या प्रतिनिधींनी लोकमतशी बोलताना दिली.
-----
कंपन्यांचे खबरदारीचे उपाय
क्लेमसाठी ज्या विमा कंपनीकडे कागदपत्रे सादर केली जाणार आहेत त्या कंपनीचे नाव अँडमिशन पेपर पासून ते डिश्चार्ज कार्ड आणि अंतिम बिलापर्यंतच्या प्रत्येक कागदावर लिहूनच स्कॅन करण्याची अट काही कंपन्यांनी घातली आहे. तर, लाँकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर क्लेमसाठी मेल केलेली सर्व कागदपत्रे मुळ स्वरुपात कंपनीला सादर केली जातील असे हमी पत्र रुग्ण आणि एजंटकडून घेतल्यानंतरच काही कंपन्या परतावा देत आहेत.