३० लाख विद्यार्थ्यांना २० रुपयांत विमाकवच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 07:51 AM2023-10-17T07:51:57+5:302023-10-17T07:52:23+5:30
विद्यार्थ्यांना ही योजना बंधनकारक नसेल. त्यांनी प्रत्येकी २० रुपये दरवर्षी भरले की एक लाख रुपयांचे विमाकवच मिळेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील ३० लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फक्त २० रुपयात विमाकवच देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षणही दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थी जीवन/अपघात विमा योजना राबविली जाणार आहे. या योजनेचा प्रस्ताव उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सादर केला होता.
विद्यार्थ्यांना ही योजना बंधनकारक नसेल. त्यांनी प्रत्येकी २० रुपये दरवर्षी भरले की एक लाख रुपयांचे विमाकवच मिळेल. विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला तत्काळ एक लाख रुपयांची मदत दिली जाईल. विद्यार्थ्याने दरवर्षी ६२ रुपये भरले, तर पाच लाख रुपयांचे विमाकवच त्याला दिले जाईल. कोणताही विद्यार्थी जखमी झाला तर कमीतकमी एक लाख रुपये ते जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केले जातील.
ही योजना राज्य पातळीवर राबविताना त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. बारावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांमधील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल. सरसकट सर्व विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू असेल. पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा हा निकष नसेल.