Join us

पुरामुळे गाडीचे नुकसान झाल्यास विम्याची भरपाई मिळेल, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:05 AM

मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे मनुष्यहानीसोबतच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर पार्किंगमध्ये, रस्त्याच्या ...

मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे मनुष्यहानीसोबतच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर पार्किंगमध्ये, रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या दुचाकी, चारचाकी वाहून गेल्या आहेत. ही वाहने दुरुस्ती करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. अशावेळी संबंधित वाहनासाठी काढलेल्या विम्यातून भरपाई मिळू शकेल का, पुराच्या किंवा पावसाच्या पाण्यामुळे गाडीचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळते का, या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न.

.......

- पूर किंवा पावसाच्या पाण्यामुळे वाहनाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते का?

वाहन विमा दोन प्रकारचे असतात. सर्वसमावेशक म्हणजे 'काँप्रिहेन्सीव्ह रिस्क कव्हर' आणि दुसरा 'थर्ड पार्टी इन्शुरन्स'. काँप्रिहेन्सीव्ह विमाप्रकारात कंपनी वाहनाची नुकसानभरपाई देण्यास बांधिल असते. अगदी पूर किंवा पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले तरी त्यांना पैसे द्यावे लागतात. थर्ड पार्टी प्रकारात मात्र नुकसानभरपाई मिळत नाही. वाहनाला काही वर्षे झाल्यानंतर बरेच जण कमी पैशांत 'थर्ड पार्टी इन्शुरन्स'मध्ये काम आटोपण्याचा प्रयत्न करतात.

- भरपाई मिळविण्यासाठी काय करावे लागेल?

नुकसान झालेले असल्यास गाडी आहे त्या जागी उभी ठेवा. पुरामुळे गाडी दूरवर वाहून गेली असल्यास धक्का मारून बाजूला उभी करा. त्यानंतर इन्शुरन्स कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून गाडीमालकाचे नाव, विमा क्रमांक आणि ठिकाण कळवा. कंपनीकडून निरीक्षक येऊन गाडीचे किती नुकसान झाले, याचा आढावा घेईल. जागेवर सर्वेक्षण करणे शक्य नसेल तर गाडी टो करून गॅरेजला पाठवली जाईल आणि नुकसानीचा अंदाज कंपनीला कळविला जाईल.

- पाणी ओसरल्यानंतर तातडीने गाडी सुरू करून पाहवी का?

विमा कंपनीच्या निरीक्षकाने सर्वेक्षण केल्याशिवाय गाडी सुरू करणे ही सर्वात मोठी घोडचूक ठरू शकते. कारण तसे करताना इंजिन 'हायड्रोलॉक' होण्याची शक्यता असते. म्हणजे गाडी सुरू होताना इंजिनमध्ये पाणी शिरून ते पूर्णतः निकामे होईल. विमा करारानुसार हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न आणि त्यातून झालेले इंजिनचे नुकसान 'कॉन्सिक्वेंशिअल लॉस' म्हणजे मूळ कारणापेक्षा इतर कारणाने झालेले नुकसान मानले जाते. परिणामी इंजिन दुरुस्तीचा खर्च भरपाईतून वजा केला जाईल. इंजिन दुरुस्तीसाठीच सर्वाधिक खर्च येत असल्यामुळे भरपाईचा काहीच फायदा होणार नाही.

- पूर्ण भरपाई मिळवण्यासाठी काय करावे?

गाडी सुरू करताना इंजिन 'हायड्रोलॉक' झाले की भरपाईची रक्कम कमी होते. मात्र, तुम्ही विमा घेताना ‘इंजिन कव्हर’साठी 'अ‍ॅड ऑन' हा पर्याय निवडून अतिरिक्त रक्कम मोजली असेल तर 'कॉन्सिक्वेंशिअल लॉस' अट लागू पडत नाही. त्यामुळे काँप्रिहेन्सीव्ह इंजिन कव्हर वाहनविमा काढणे फायद्याचे ठरू शकते.