मुंबई : कोरोना संकटाच्या काळात विमा काढण्यासाठी अनेकांची लगबग सुरू असतानाच इश्युरन्स रेग्युलेटरी अथाँरीटी आँफ इंडियाचे (आयआरडीएआय) आणि आरबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून फोन करणारे भामटे लोकांची फसवणूक करत आहे. त्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून लोकांनी अशा फोन काँल्सवर दिल्या जाणा-या आमिषांना बळी पडू नये असे आवाहन आयआरडीएआयच्यावतीने करण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरीक, विद्यमान विमा धारकांना या भामट्यांकडून फोन केले जात आहेत. कुठल्याही सरकारी यंत्रणांशी त्यांचा संबंध नसतानाही तसे भासवून लोकांना लुबाडणूक करण्याचा त्यांचे प्रयत्न आहेत. सध्याच्या विमा योजनांच्या माध्यमातून भरमसाठ फायदा मिळवून देतो, दावा न केलेला बोनस मिळेल, गुंतवलेल्या रकमेवर रिफंड मिळेल अशी अनेक अमिषे त्यांच्याकडून दाखवली जात आहेत. परंतु, त्यासाठी काही रक्कम आधी द्यावी लागेल असे सांगितले जाते. बँक अकाऊंट नंबर देत तिथे आगाऊ पैसे भरण्यास सांगितले जाते. परंतु, आयआरडीएआय किंवा अन्य कोणत्याही सरकारी संस्थांचे अधिकारी कर्मचारी अशा पद्धतीने पैशांची मागणी करत नाहीत. आयआरडीएआयचा विमा पाँलिसींच्या विक्रीशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे या भामट्यांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. लोकांनी विमा कंपन्यांशी थेट संपर्क साधून त्यांना अपेक्षित असलेल्या कामांबाबत विचारणा करावी. अधिकृत प्रतिनिधींशीच व्यवहार करावेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.