देशातील सर्व कमांड्स एकात्मिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 04:49 AM2018-10-26T04:49:49+5:302018-10-26T04:49:58+5:30

लष्करी दलांचे देशभरातील सर्व कमांड येत्या काळात एकात्मिक होतील.

 Integrate all the commands in the country | देशातील सर्व कमांड्स एकात्मिक

देशातील सर्व कमांड्स एकात्मिक

googlenewsNext

मुंबई : लष्करी दलांचे देशभरातील सर्व कमांड येत्या काळात एकात्मिक होतील. अंदमान-निकोबारमधील तिन्ही दलांच्या संयुक्त व एकात्मिक कमांडच्या धर्तीवर संरक्षण दलांनी तयारी सुरु केली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘इंडिया समिट’या आर्थिक परिषदेत गुरुवारी मुंबईत दिली.
देशभरातील सर्व कमांड एकात्मिक केल्यास संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्तांचा सर्वोत्तम उपयोग तिन्ही दले करु शकतील. तिन्ही दलांमध्ये समन्वय वाढेल व देशाचे सुरक्षा कवच आणखी बळकट होईल, असे मत सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केले.
सैन्यदलात कपात करण्यासंबंधी निवृत्त लेफ्टनंट जनरल शेकटकर यांच्या समितीच्या शिफारसींवर तिन्ही दलात चर्चा झाली आहे. समितीने सैन्यदलांच्या आधुनिकीकरणासंबंधी दिलेल्या शिफारशींबाबत आतापर्यंत फक्त तिन्ही दलांच्या प्रमुखांनी चर्चा केली आहे. संरक्षण मंत्री या नात्याने माझ्याशी चर्चा झालेली नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राफेलबाबत त्या म्हणाल्या, भारताला विमाने विक्री करताना कोणाला भागीदार निवडायचे व किती भागीदार निवडायचे, हा पूर्ण दसॉल्टचा अधिकार आहे. हा निकष याआधीच्या सरकारने तयार केलेल्या यासंबंधीच्या करारातच होता. त्याआधारेच दसॉल्टकडून विमान खरेदी होत आहे. फरक इतकाच की याआधीच्या सरकारने १८ विमाने थेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पण हवाई दलाची तातडीची गरज पाहता आम्ही ३६ विमाने खरेदी केली. दसॉल्टने या विमान निर्मितीसाठी किती भागीदार निवडले आहेत, ते एकच आहेत की अनेक, हे फक्त दसॉल्टलाच माहित आहे. त्यांनी अद्याप तरी याबाबत सरकारला अधिकृत कळवलेले नाही.
>निर्णय प्रत्यक्षात आणणे अवघडच
तिन्ही दलांचे सध्या देशात विविध ठिकाणी कमांड आहेत. हे सर्व कमांड भौगोलिक स्थितीनुसार तयार करण्यात आले आहेत. या कमांडअंतर्गत तिन्ही दलांचे काम वेगवेगळे चालते. पण देशात अन्यत्र असलेल्या कमांडमधील सैन्यसंख्येपेक्षा अंदमान-निकोबारमधील सैन्यसंख्या तुलनेने खूप कमी आहे. त्यामुळे अंदमान-निकोबारच्या धर्तीवर देशभरातील सर्व कमांड्सना एकात्मिक करता येणे वास्तवातच शक्य आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Web Title:  Integrate all the commands in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.