भिवंडी : माणकोलीनाका येथील उड्डाणपुलामुळे ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. माणकोलीनाका येथील उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गिकेचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई आणि परिसरातील वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन आम्ही मेट्रोला प्राधान्य दिले असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या १० वर्षांत मेट्रोचे १० किमी काम झाले नव्हते. आम्ही गेल्या २ वर्षांत १२० किमीचे काम सुरू केले आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी भागांत ५५९ कोटींचे ५ उड्डाणपूल बनवण्यात येत आहेत. नजीकच्या काळात वंजारपट्टीनाका, राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर, ठाणे-भिवंडीमार्गावरील माणकोली, रांजनोली तसेच मोठागाव ते ठाकुर्ली-डोंबिवली अशा वाहतूक प्रकल्पांमुळे या भागातील दळणवळण सुरळीत होऊन वाहतूकही वेगवान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मेट्रोमुळे कसा फरक पडतोय, हे स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, २ कोटी मोठ्या झाडांमुळे कार्बन उत्सर्जनाचे जेवढे परिणाम रोखले जातील, तेवढेच ते मेट्रोच्या मार्गामुळे कमी होतील. पर्यावरणाला पूरक अशा या वाहतूकप्रणालीचा एकात्मिक विकास केला जात आहे. ते पुढे म्हणाले की, मुंबई-ठाणे-कल्याण-भिवंडी-भार्इंदर अशी एकात्मिक आणि वर्तुळाकार वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाईल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यामुळे एमएमआरडीएमधील सगळी छोटीमोठी शहरे एकमेकांना जोडली जातील. यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला सर्वेक्षणाचे काम दिले आहे. (प्रतिनिधी)पुलासाठीही बैठक घ्या- पालकमंत्रीपालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-कल्याण मेट्रो रेल्वेचा मार्ग कल्याणच्या पश्चिम भागातून नेण्याची सूचना केली. ठाकुर्ली ते माणकोली आणि दुर्गाडी येथील पुलांच्या कामाला वेग द्यावा. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सावे पुलाच्या वेगवान दुरुस्तीसाठी महामार्ग प्राधिकरणाबरोबर बैठक घ्यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. वर्सोवा पुलाच्या बाबतीतदेखील मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवून राष्ट्रीय महामार्गासह सर्व संबंधितांना निर्देश द्यावेत, म्हणजे काम वेळेत पूर्ण होऊन वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल. तळोजापर्यंत आलेली मेट्रो कल्याणपर्यंत आणावी, अशी सूचनाही त्यांनी केली.‘३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा हवा’ जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा परिसरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी राहनाळ ते ओसवाल हॉल आणि जकातनाक्यापर्यंत पूल उभारण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार पाटील यांनी दिली. भिवंडीतील ६० गावांच्या विकासासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प आराखड्यात (डीपीआर) रिंगरूटचा समावेश करावा. तालुक्याचा अनेक वर्षांपासून असलेला ८ दशलक्ष लीटर पाण्याचा कोटा लोकसंख्या वाढल्याने ३० दशलक्ष लीटर करावा. तसेच धार्मिक स्थळे तोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून राज्य सरकारने सुवर्णमध्य काढून ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करावा, अशा मागण्या पाटील यांनी केली.‘धर्माधिकारी यांचे नाव द्या’महाराष्ट्रभूषण व सुप्रसिद्ध निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी मोठ्या संख्येने भिवंडीत राहतात. त्यामुळे माणकोलीनाका येथील उड्डाणपुलास डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी केली. त्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
एकात्मिक, चक्राकार वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देणार !
By admin | Published: April 09, 2017 12:45 AM